सराफ गल्लीतील तीन ज्वेलर्स दुकाने फोडून चोरट्यांनी धाडसी कृत्य केल्याने व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण Pudhari
कोल्हापूर

Jewelry Shop Robbery | बांबवड्यात पोलीस चौकी शेजारीच सराफ दुकाने फोडली: व्यापारी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

यापूर्वी घडलेल्या अनेक चोरीच्या घटनांचा उलगडा न झाल्याने नागरिकांमध्ये पोलिसांविषयी नाराजी

पुढारी वृत्तसेवा

Shahuwadi Bambavade Jewelry Shop Robbery

बांबवडे : शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे परिसरात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे पोलीस चौकीच्या शेजारीच असलेल्या सराफ गल्लीतील तीन ज्वेलर्स दुकाने फोडून चोरट्यांनी धाडसी कृत्य केल्याने व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मंगळवारी मध्यरात्री सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात चोरटे व्हॅनमधून येथे आले. त्यांनी कटरच्या सहाय्याने तीन ज्वेलर्स दुकानांचे शटर तोडून आत प्रवेश केला आणि अंदाजे १ लाख १० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. सुदैवाने दुकानांतील लॉकर सुरक्षित राहिल्याने मोठे नुकसान टळले.

या घटनेत चोरट्यांनी दोन दुकानांमधील सीसीटीव्ही डीव्हीआरही चोरून नेल्याने तपासात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, परिसरातील इतर कॅमेऱ्यांमध्ये सुमारे पाच संशयित दिसून आले असून त्यांनी चेहरा झाकलेला असल्याने ओळख पटवणे अवघड ठरत आहे.

या प्रकरणाची नोंद शाहूवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून तपास सुरू आहे. तथापि, यापूर्वी घडलेल्या अनेक चोरीच्या घटनांचा उलगडा न झाल्याने नागरिकांमध्ये पोलिसांविषयी नाराजी वाढत आहे.

बांबवडे एसटी स्टँड परिसर नेहमीच गजबजलेला असतो. येथे पोलीस चौकी असूनही अशा प्रकारची चोरी झाल्याने गस्त व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. गेल्या काही महिन्यांतही अशा घटना घडल्या आहेत. सहा महिन्यांपूर्वी बँकेतून पैसे काढून बाहेर पडलेल्या व्यक्तीची १ लाख रुपयांची बॅग चोरीला गेली होती, तर चार महिन्यांपूर्वी साळशी येथे धार्मिक कार्यक्रमादरम्यान सुमारे १० लाख रुपयांचे दागिने लंपास करण्यात आले होते. या दोन्ही प्रकरणांचा अद्याप तपास लागलेला नाही.

तसेच आठवडी बाजाराच्या दिवशी दुचाकी, मोबाईल आणि किरकोळ चोऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. काही ठिकाणी अवैध व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा धाक कमी झाल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

दरम्यान, व्यापारी आणि नागरिकांनी पोलिसांनी गस्त वाढवून सुरक्षा यंत्रणा मजबूत करावी, तसेच चोरीच्या घटनांचा लवकरात लवकर उलगडा करावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT