kolhapur | बजरंग दल कार्यकर्त्याला पिस्तुलाचा धाक दाखवून हत्या करण्याची धमकी

शिरोली परिसरात प्रचंड तणाव; कार्यकर्त्यांची पोलिस ठाण्यासमोर गर्दी
शिरोली पुलाची : बुधवारी रात्री उशिरापर्यंत कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी केली होती.
शिरोली पुलाची : बुधवारी रात्री उशिरापर्यंत कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी केली होती.
Published on
Updated on

नागाव : शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील लव्ह जिहाद प्रकरणावरून जिल्ह्यात वातावरण तापले असतानाच बुधवारी सायंकाळी बजरंग दलाचे कार्यकर्ते नीलेश शिंदे यांना अज्ञात दोघांनी पिस्तुलाचा धाक दाखवून हत्या करण्याची धमकी दिली. या प्रकरणातून माघार न घेतल्यास परिणामांना सामोरे जा, असा इशारा देत हल्लेखोर पसार झाले. या घटनेमुळे शिरोली परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून, रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.

धमकीप्रकरणी हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक

शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील लव्ह जिहाद प्रकरणावरून हिंदू समाज आक्रमक झाला असताना बुधवारी बजरंग दलाचे कार्यकर्ते नीलेश शिंदे याला अज्ञात दोघांनी पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेची माहिती मिळताच शिरोली परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून, रात्री उशिरा शिरोली एमआयडीसी पोलिस ठाणे आवारात दीड हजारांचा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा जमाव एकत्र येत त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. गुन्हा दाखल करून घेण्यावरून पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची उडाली.

नीलेश शिंदे कोल्हापूर येथील कुंदन पाटील यांची भेट घेऊन शिरोली गावाकडे परत येत होता. त्याला पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील पंचगंगा नदीजवळील पीर दर्ग्याजवळ सेवा रस्त्यावर मागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अडवले. संशयितांनी थेट पिस्तुलाचा धाक दाखवत लव्ह जिहाद प्रकरणातून माघार घे, अन्यथा जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिथून पोबारा केला. घटनेनंतर भयभीत झालेल्या शिंदे यांनी तत्काळ शिरोली पोलिस ठाण्याचे गोपनीय पोलिस नीलेश कांबळे यांना फोनवरून माहिती दिली. कांबळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली आणि सहायक पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांना फोन करून सर्व माहिती दिली . आमच्या आया बहिणींना संरक्षण नाही, मात्र नराधमांच्या नातेवाईकांना पोलिस संरक्षण दिले जाते. हा कोणता कायदा, असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.

घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलिस प्रमुख निलोत्पल यांनी शिरोली पोलिस ठाण्यास भेट देऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली. यावेळी करवीर विभागीय पोलिस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर आणि सहायक पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. आरोपींना एक मेपर्यंत, दोन दिवसांत शोधून काढण्याचे आश्वासन दिले. नीलेश शिंदे आणि योगेश खाडे या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले.

सकल हिंदू समाजाचा तीव्र उद्रेक

घटनेची माहिती मिळताच सकल हिंदू समाजाचे सुमारे दीड हजार पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात जमा झाले. हल्लेखोरांचा तत्काळ शोध घेऊन त्यांना अटक करावी, या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यातच ठिय्या मांडला. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी काही संशयितांच्या नावासह त्यांच्या घरांवरील पोलिस बंदोबस्त काढून घेण्याची तसेच नासिर गोलंदाज याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. यावेळी झालेल्या चर्चेत बजरंग दलाचे कुंदन पाटील, माथाडी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश खाडे, माजी उपसरपंच कृष्णात करपे, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, प्रकाश कौंदाडे, राहुल खवरे, सुरेश यादव, अर्जून चौगुले, दीपक रानमाळे, संभाजी भोसले, योगेश खवरे आदींनी सहभाग घेतला. शिरोली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली असून, गाडीवरून आलेल्या अज्ञातांचा शोध घेण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात आहे. दरम्यान, रात्री उशिरा आसपासच्या गावातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते शिरोलीकडे येण्यास निघाले असता त्यांना त्या त्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोलिसांनी रोखले.

पोलिस प्रशासनाची भूमिका!

घटनेची तीव्रता लक्षात घेऊन प्रशिक्षणार्थी जिल्हा पोलिस अधीक्षक आरांक्षा यादव, पोलिस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांनी पोलिस ठाण्याला भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिस यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वांनी शांतता राखून तपासात सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

दोन तरुणांची धुलाई

रात्री उशिरा शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या समोर शिरोलीतील एका विशिष्ट समाजाचे दोन तरुण मोटारसायकलवरून जमावात आले. त्यांची कार्यकर्त्यांनी चांगलीच धुलाई केली. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांची सुटका केली. यावेळी काही काळ वातावरण तंग झाले होते. परिस्थिती काबूत ठेवण्यासाठी राज्य राखीव पोलिस दल, दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. शिरोली एमआयडीसी सह परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे.

दोघा अज्ञातांवर गुन्हा

नीलेश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधीक्षक निलोत्पल यांचे मार्गदर्शनाखाली सुजित कुमार क्षीरसागर तपास करत आहेत.

दै. ‘पुढारी’ने सर्वप्रथम टाकला प्रकाशझोत

दै. ‘पुढारी’ने याप्रकरणी सर्वप्रथम प्रकाशझोत टाकला. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी गंभीर दखल घेऊन गुन्ह्याची वाढती व्याप्ती लक्षात घेता ‘एसआयटी’ स्थापन केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news