Kolhapur-Ratnagiri Highway | कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर भूस्खलनाचा धोका

वाघबीळ, भाडळे खिंड, मार्लेश्वर परिसर भविष्यात भूस्खलनाचा ‘हॉटस्पॉट’ बनण्याची शक्यता
Kolhapur Ratnagiri highway landslide risk |
Kolhapur-Ratnagiri Highway | कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर भूस्खलनाचा धोका
Published on
Updated on

सुनील कदम

कोल्हापूर : कोल्हापूर ते रत्नागिरी महामार्गावर कित्येक ठिकाणी भूस्खलनाचे हॉटस्पॉट तयार झालेले दिसत आहेत. त्यामुळे भविष्यात हा महामार्ग धोकादायक गणला जाण्याची शक्यता आहे. वाघबीळ, भाडळे खिंड, मार्लेश्वर परिसरात भविष्यात भूस्खलनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

केर्ले ते वाघबीळदरम्यान रस्ता रुंदीकरण आणि वाघबीळ दरीवरील उड्डाण पुलासाठी लगतचे डोंगरकडे उभे कापण्यात आले आहेत. या ठिकाणचे डोंगर हे खडकाळ स्वरूपाचे आहेत. त्यामुळे या ठिकाणी पावसाळ्याच्या दरम्यान वारंवार भूस्खलनाच्या घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बोरपाडळेतही तीच शक्यता आहे.

भाडळे खिंडीतील धोका

भाडळे खिंड येथे या महामार्गावरील चढाव कमी करण्यासाठी आणि रस्ता रुंदीकरणासाठी दोन्ही बाजूचे डोंगर शंभर ते सव्वासे फुटांनी उभे कापण्यात आले आहेत. त्यामुळे या ठिकाणी रस्त्यांच्या दुतर्फा कमकुवत झालेले डोंगरकडे उभा राहिलेले दिसतात. ऐन पावसाळ्यात पाणी व रस्त्यावरील रहदारीच्या हादर्‍यांमुळे या ठिकाणी वारंवार भूस्खलनाच्या घटना घडण्याची शक्यता व्यक्त होत आहेत.

मार्लेश्वर स्पॉट

मार्लेश्वरपासून ते अगदी पालीपर्यंत रस्ता रुंदीकरणासाठी लगतच्या डोंगररांगा उभ्या कापलेल्या दिसतात. या भागातील डोंगररांगा या मुळातच दगड-मातीच्या आणि भुसभुशीत स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात उभे कापलेले हे डोंगर कधीही कोसळून रस्त्यावर येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मार्लेश्वरपासून ते पालीपर्यंतच्या अंतरात संभाव्य भूस्खलनाचे असे अनेक हॉटस्पॉट आढळून येतात. या भागात भूस्खलनाचे प्रकार होत राहिल्यास या महामार्गावरील वाहतूक वारंवार खंडित होण्याची महामार्गावरील वाहतूक अन्य पर्यायी मार्गांकडे वळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी व्यापक उपाययोजना करण्याची आवश्यकता दिसत आहे.

ठोस उपाययोजनांची आवश्यकता

या महामार्गावर ज्या ठिकाणी भूस्खलनाचा धोका संभवतो त्या ठिकाणी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. वाघबीळ येथे भूस्खलन झाल्यास कोल्हापूरचे कोकणातील दळणवळण विस्कळीत होणार आहे. भाडळे खिंडीत भूस्खलन झाल्यास संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राची कोकणातील वाहतूक कोलमडणार आहे. त्यामुळे या मार्गावरील भूस्खलनाची संभाव्य ठिकाणे ओळखून ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news