

कोल्हापूर : वाढत्या उन्हाबरोबरच जिल्ह्याला आता पाणी टंचाईच्याही झळा बसू लागल्या आहेत. धरणातील सध्याचा पाणीसाठा, यंदाचे पाऊसमान याचा विचार करून प्रशासनाने काटकसर सुरू केली आहे. प्रमुख आठ धरणांत 26 टीएमसी साठा शिल्लक आहे. पंचगंगेची पाणी पातळीही खालावली आहे. परिणामी, कोल्हापूरला पाणीपुरवठा करणार्या बालिंगा, नागदेववाडीसह थेट पाईपलाईनमधून दिवसाआड उपसा केला जाणार आहे.
धरणांत सरासरी 42 टक्के साठा
जिल्ह्यातील मोठ्या आणि मध्यम धरणांत सध्या सरासरी 42 टक्के पाणी साठा शिल्लक आहे. ‘एल निनो आणि ला निना’च्या पार्श्वभूमीवर पाऊस लांबण्याची शक्यता असल्याने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत उपलब्ध पाणीसाठा जपून वापरण्याबाबत नियोजन केले आहे.
यंदा हवामानातील बदल लक्षात घेता एल निनो व ला निना या दोन्ही परिस्थितींचा परिणाम होण्याच्या शक्यतेमुळे जलसंपदा विभागाने 31 ऑगस्ट 2026 पर्यंत धरणांतील उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून सिंचनाचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील प्रमुख आठ धरणांत 26.67 टीएमसी पाणी आहे. राधानगरी धरणात आजच्या दिवसापर्यंत गतवर्षीच्या तुलनेत 0.43 टीएमसी कमी साठा आहे.
धरणातील साठा कमी झाल्याने नद्यांच्या पातळीवरही परिणाम होत आहे. राधानगरी धरणातील विसर्ग कमी होत असल्याने पंचगंगेची पातळीही कमी होत चालली आहे. परिणामी, नदीतून पाणी उपसा करण्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
जलसंपदाच्या पत्रानंतर महापालिकेकडून काटकसर
कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा होणार्या काळम्मावाडी, राधानगरी धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने महापालिकेला पाठवलेल्या पत्रानुसार कोल्हापूर महापालिकेने पाण्याची काटकसर सुरू केली आहे. यामुळे थेट पाईपलाईनसह बालिंगा, नागदेववाडी केंद्रावरून दिवसाआड पाणी उपसा केला जाणार आहे.
काळम्मावाडी धरणातून कोल्हापूरसाठी दररोज सुमारे 210 एम. एल. डी. पाण्याचा उपसा केला जातो. सद्यस्थितीत काळम्मावाडी धरणातील साठा कमी होत चालला आहे. धरणाची पातळी 14 मीटरच्या खाली गेल्यास पाणी उपसा करण्यास अडथळा होतो. यामुळे 15 ऑगस्टपर्यंत पाणी पातळी 14 मीटर पर्यंत राहावी, याकरिता धरणातून दिवसाआड पाणी उपसा केला जाणार आहे. आवश्यक भासल्यास चारपैकी एक पंप सुरू ठेवला जाणार आहे.
शहराला यापूर्वी शिंगणापूर, बालिंगा व नागदेववाडी उपसा केंद्रातून पाणीपुरवठा केला जात होता. दिवसाआड पाणीपुरवठ्यासाठी बालिंगा व नागदेववाडी उपसा केंद्रातून पाणीपुरवठा केला जाणार आहे. शिंगणापूर उपसा केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे.
तसेच मंगळवार पेठेसह इतर ठिकाणी कळंबा तलावातून पाणीपुरवठा होतो. हा पाणीपुरवठा आणखी 15 ते 20 दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर इतर योजनांतून मंगळवार पेठेत पाणीपुरवठा सुरू होईल.
टँकरसाठी 35 लाख
शहरात अनेकवेळा विविध कारणांनी पाणीपुरवठा बंद होतो. त्यामुळे महापालिकेच्या बजेटमध्ये टँकरने पाणीपुरवठ्यासाठी 35 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. सद्यस्थितीत महापालिकेकडे चार टँकर आहेत. प्रशासनाला आवश्यकता वाटल्यास 10 हजार लिटरचे मोठे टँकर भाड्याने घेण्यात येणार आहेत.