Gokul Dairy Chairman Hearing : गोकुळ दूध संघाची अध्यक्षपदाची निवडणूक आणि शासन नियुक्त संचालकांच्या मतदानाच्या अधिकाराशी संबंधित प्रकरणाची सुनावणी आज (दि. २५ नोव्हेंबर) मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये झाली.आजच्या सुनावणीवेळी शासन नियुक्त चार संचालकांनाही पुढील तारखेची नोटीस काढण्याची सूचना न्यायालयाने केली. आता या प्रकरणी पुढील सुनावणी ३ डिसेंबरला होणार आहे.
राज्य सरकारने सहकार कायद्यात सुधारणा करत चार अशासकीय संचालकांची नियुक्ती करून त्यांना मताचा अधिकार दिल्याने समविचारी आघाडीने कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली होती. समविचारी आघाडीने दाखल केलेल्या दोन याचिकांवर आज न्यायालयात दुरुस्ती अर्ज सादर करण्यात आला. अध्यक्ष निवडीसाठी दहा तारखेला झालेल्या अध्यक्ष निवड बैठकीतील घटना रेकॉर्डवर आणायच्या होत्या. तसेच, ज्या संचालकांना अद्याप नोटीस दिलेली नाही, अशा संचालकांना नोटीस देण्यासाठी विनंती केली. कोर्टाने ही विनंती मंजूर केली.
समविचारी आघाडीने दाखल केलेल्या दोन याचिकांवर आज न्यायालयात दुरुस्ती अर्ज सादर करण्यात आला. अध्यक्ष निवडीसाठी दहा तारखेला झालेल्या अध्यक्ष निवड बैठकीतील घटना रेकॉर्डवर आणायच्या होत्या. तसेच, ज्या संचालकांना अद्याप नोटीस दिलेली नाही, अशा संचालकांना नोटीस देण्यासाठी विनंती करण्यात आली. न्यायालयाने ही विनंती मंजूर केली आहे, अशी माहिती समविचारी आघाडीचे वकील गणबावले यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
गोकुळच्या निवडणुकीत महायुतीच्या आघाडीला १२, तर राजर्षी शाहू समविचारी आघाडीला १३ जागा मिळाल्या. समविचारी आघाडीला बहुमत मिळूनही अध्यक्ष निवडीच्या सभेला महायुतीचे संचालक अनुपस्थित राहिले. कोरमसाठी आवश्यक असलेले १४ संचालकांचे संख्याबळ पूर्ण न झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांनी सभा तहकूब केली होती. या निर्णयाविरोधात समविचारी आघाडीने कोल्हापूर उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने सर्व संचालकांना नोटीस बजावत अध्यक्ष निवड सभेला हजर राहण्याचे निर्देश दिले होते. यानंतर महायुती सरकारने राज्यातील पाचशे कोटींपेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांमध्ये पाच शासन नियुक्त सदस्य नेमण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला होता.
गोकुळ अध्यक्ष निवडीवेळी शासन नियुक्त चार संचालकांना मतदानाचा अधिकार देणाऱ्या निर्णयाला समविचारी आघाडीने विरोध केला होता. मात्र, न्यायालयाने सरकारच्या अध्यादेशाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार देत शासन नियुक्त संचालकांची मते स्वतंत्र घेण्याचे निर्देश दिले होते. तसेच, अध्यक्ष निवडीची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया आणि निकाल याचिकेच्या अंतिम निर्णयाच्या अधीन ठेवला होता. या चार मतांच्या पाठबळावर महायुतीचे राजेश पाटील अध्यक्षपदी निवडून आले. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे राज्याचे लक्ष वेधले होते.