

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, गोकुळला सहा महिन्यांच्या ताळेबंदात सुमारे ७० कोटी रुपयांचे नुकसान झाले. विशेषत: पशुखाद्य विभागातील तोट्याने संघाचा ताळेबंद बिघडला आहे. मार्चअखेरपर्यंत हे नुकसान भरून काढण्याचे आव्हान संचालकांसमोर आहे. ताळेबंदातील नुकसान भरुन काढण्यासाठीच गोकुळने प्रथमच विक्री दरात उच्चांकी सहा रुपये दरवाढ केली आहे. नववर्षात विक्री दरात आणखी सहा रुपये दरवाढ होण्याची शक्यता आहे.
गोकुळच्या मागील अर्थिक वर्षात सप्टेंबर २०२५ मध्ये ताळेबंदचा आढावा घेतला तेंव्हा संघ १२५ कोटी फायद्यात होता. त्यामुळे तत्कालीन संचालक मंडळाने दूध उत्पादकांना खरेदी दरात वाढ देण्याचा निर्णय घेतला. पण विक्री दरात वाढ केली नाही. यानंतर मे २०२६ मध्ये संघावर प्रशासक मंडळाची नियुक्ती झाली. यादरम्यान पशुखाद्याच्या कच्च्या मालाच्या दरात मोठी वाढ झाली. मात्र, प्रशासक मंडळाने पशुखाद्य विक्री दरात वाढ न केल्याने संघाचा ताळेबंद तोट्यात गेल्याचे संचालकांनी सांगितले. ताळेबंद पूर्ववत करण्यासाठी विक्री दरात दरवाढ करण्याशिवाय पर्याय नसल्याची स्पष्टोक्ती काही संचालकांकडून देण्यात आली.
वितरकांच्या मार्जिनमध्ये वाढ नको
गोकुळच्या पुणे-मुंबई येथील वितरकांनी मार्जिनमध्ये वाढ करण्याची मागणी केली होती. मात्र, संघाला मोठा तोटा झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत ताळेबंदातील नुकसान भरून काढण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी दूध वितरकांच्या विक्री मार्जिनमध्ये कोणतीही वाढ न करण्याची सूचना समविचारी आघाडीच्या संचालकांनी गुरुवारी झालेल्या बैठकीत केली.
शासन नियुक्त संचालकांची अनुपस्थिती
गुरुवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीला शासननियुक्त चार संचालकांची अनुपस्थिती होती. त्यांना बैठकीचा निरोप नसल्याचे समजते. त्यामुळे शासन नियुक्त संचालकांच्या अनुपस्थितीवरून उलट-सुलट चर्चा सुरू होती.
विक्री दरात प्रथमच उच्चांकी वाढ
गोकुळने दहा वर्षांत खरेदी-विक्री दरात बहुतांश वेळा दोन रुपयांची वाढ केली आहे. मात्र, प्रथमच उत्पादकांना उच्चांकी तीन रुपये तर विक्री दरातही आतापर्यंतची सर्वाधिक सहा रुपये दरवाढ केली आहे. यामुळे एकीकडे दूध उत्पादकांना दिलासा मिळाला तर दूसरीकडे ग्राहकांना मात्र दरवाढीचा चटका बसला आहे. बैठकीला संचालक अभिजीत तायशेटे, शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगले, अंबरिष घाटगे, अजित नरके, डॉ. चेतन नरके, बाबासाहेब चौगले, अमरसिंह पाटील, अंजना रेडेकर आदींसह अन्य संचालक व कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले उपस्थित होते.
पशुखाद्य दरवाढ प्रलंबित
गोकुळच्या संचालक मंडळाने दूध खरेदी-विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. बैठकीमध्ये पशुखाद्यमुळे होणार्या तोट्यावर चर्चा झाली. यासंदर्भात स्वतंत्र बैठक घेण्याचे बैठकीत ठरले. त्यामुळे पशुखाद्य विक्री दरवाढीचा निर्णय प्रलंबित राहिला आहे.