कोल्हापूर : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उच्चशिक्षित तसेच शिक्षण व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉ. स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीला ‘पदवीधर मित्र’ संघटनेने सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. संघटनेचे अध्यक्ष माणिक पाटील (चुयेकर) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनातून ही भूमिका स्पष्ट केली.
पत्रमहर्षी कै. ग. गो. जाधव यांच्या नातसून आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पत्रकारिता, राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या सून डॉ. स्मिता जाधव यांच्या राजकीय क्षेत्रातील सक्रिय प्रवेशाचे पाटील यांनी स्वागत केले आहे.
दैनिक ‘पुढारी’ने पत्रकारितेबरोबरच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, उद्योग, क्रीडा, सहकार व प्रशासन अशा विविध क्षेत्रांच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. या माध्यमातून अनेक कर्तृत्ववान व्यक्तींना व्यासपीठ मिळाले असून त्यातील अनेकजण राज्यपाल, मंत्री तसेच विविध महत्त्वाच्या पदांवर पोहोचले आहेत. ‘पुढारी’ परिवाराने विविध क्षेत्रांतील प्रतिभावंतांना प्रोत्साहन देत त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळवून दिल्याचे पाटील यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर पुणे पदवीधर मतदारसंघातील सर्व घटकांनी डॉ. स्मितादेवी जाधव यांना सक्रिय पाठिंबा द्यावा, असे आवाहन माणिक पाटील यांनी केले आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघातील सन २००२ आणि २००८च्या निवडणुकीत पाटील हे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होते. या मतदारसंघातील पदवीधर मतदारांशी त्यांचा २५ वर्षांहून अधिक काळाचा संपर्क असून, पाचही जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात पदवीधर मतदार नोंदणी करण्याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे.