

पुणे : राज्यातील आगामी विधान परिषद निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या तीन उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा केली आहे. यामध्ये सर्वात लक्षवेधी ठरलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघातून शिक्षणतज्ज्ञ डॉ. स्मिता योगेश जाधव यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, आज सायंकाळी भाजपच्या पुणे शहर कार्यालयात डॉ. स्मिता योगेश जाधव यांचा पक्षप्रवेश सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश झाला. यावेळी पक्षाचे नेते आणि प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. स्मिता योगेश जाधव यांनी तंत्रज्ञान, व्यवस्थापन आणि शिक्षण अशा तिन्ही प्रमुख शाखांचे उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी बी.ई. (कॉम्प्युटर्स), एमबीए (फायनान्शियल मॅनेजमेंट), पीएच.डी. (एज्युकेशन) प्राप्त केली आहे. तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्राची उत्तम जाण असण्यासोबतच त्यांनी शिक्षण विषयात डॉक्टरेट पूर्ण केल्यामुळे शैक्षणिक प्रशासनाचा त्यांना सखोल अभ्यास आहे.
शिक्षण क्षेत्रात नवकल्पना, सर्जनशीलता आणि धोरणात्मक नेतृत्वाचा मेळ घालत नवे बदल घडवण्यात डॉ. स्मिता योगेश जाधव यांचे भरीव योगदान राहिले आहे. सध्या त्या महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. यामध्ये प्र-कुलगुरू : पिंपरी (पुणे) येथील नामांकित डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, सचिव : डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी अशा पदांवर त्या कार्यरत आहेत. शैक्षणिक धोरणांची आखणी आणि संस्थात्मक प्रशासन हाताळण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे.