कोल्हापूर

कोल्हापूर : कुरुंदवाडमध्ये ९ टक्के कर आकारणी; सर्वपक्षीय कृती समितीच्या लढ्याला यश

दिनेश चोरगे

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा :  कुरुंदवाड पालिकेने शहरातील मिळकतीवर ९ टक्के कर आकारणीचा निर्णय चतुर्थ वार्षिक कर आकारणी अपिलय समितीने जाहीर केला आहे. कोरोना व महापूर या नैसर्गिक आपत्तीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून समितीने हा निर्णय घेतल्याची माहिती प्रशासक तथा मुख्याधिकारी आशिष चौहान यांनी  पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून करवाढ कमी करण्यासंदर्भात लढा उभा करण्यात आला होता. माजी मंत्री डॉं. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या प्रयत्नातून आणि पालिका प्रशासनाच्या सहकार्याने शहराची वाढीव कर आकारणीत सवलत मिळून ९ टक्के लागू झाल्याने लढा यशस्वी झाल्याचे कृती समितीचे अध्यक्ष सुनील कुरुंदवाडे यांनी सांगितले.

कुरुंदवाड पालिकेने चतुर्थ वार्षिक 20 टक्के कर आकारणीच्या नोटिसा लागू केल्या होत्या. याला सर्वपक्षीय कृती समितीसह मित्र पक्षांनी महापूर आणि कोरोनाच्या आपत्तीची समस्या सांगत करमाफी करावी, अशी मागणी केली होती. 2 हजार,742 मिळकतधारकांनी कर मान्य नसल्याच्या हरकती दाखल केल्या होत्या. यावर चतुर्थ वार्षिक कर आकारणी समितीचे प्रांत अधिकारी डॉ. विकास खरात, नगररचना अधिकारी प्रमोद गावंडे, मुख्याधिकारी आशिष चौहान यांनी सुनावणीनंतर ५ टक्के कमी करून १५ टक्के कर आकारणी करत असल्याची घोषणा केली होती.

१५ टक्के आकारणीलाही सर्वपक्षीय कृती समिती आणि नागरिकांनी विरोध करत पुन्हा अपिलीय समिती समोर ४५३ मिळकत धारकांनी हरकती दाखल केल्या. कर आकारणी समितीने गेल्या चार वर्षात शहरात नैसर्गिक व जागतिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा  विचार करत १५ टक्के कर आकारणीत सवलत देऊन ६ टक्के कमी करत ९ टक्के कर आकारणीचा निर्णय घेतला आहे.  नऊ टक्के कर आकारणीच्या अंतिम नोटीसा नागरिकांना लवकरच लागू करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी चौहान यांनी सांगितले. यावेळी बांधकाम अभियंता योगेश गुरव, प्रदीप बोरगे, आतिष काटकर, प्रणाम शिंदे, नंदकुमार चौधरी, अभिजित कांबळे, अमोल कांबळे आदी उपस्थित होते.

हेही वाचलंत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT