कोल्हापूर | Kolhapur Flood : शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी पावसाची संततधार सुरूच होती. धरण क्षेत्रातही पाऊस सुरू असल्याने गुरुवारी रात्रीपर्यंत कमी होत चाललेली पूर पातळी पुन्हा वाढू लागली आहे. दिवसभरात ती तीन इंचांनी वाढली. सकाळी 10 वाजता 42.2 फुटांवर असलेली पाणीपातळी रात्री नऊ वाजता 42.5 फुटांवर गेली होती. उद्या शनिवारी जिल्ह्यासाठी पावसाचा यलो अलर्ट आहे. यामुळे पावसाचा जोर कमी होईल, अशी शक्यता आहे.
शहरासह जिल्ह्याला शुक्रवारी रेड अलर्ट दिला होता. यामुळे सर्वत्र सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू होता. सकाळी सुरू झालेली संततधार रात्री उशिरापर्यंत होती. जोरदार पावसाने शहरातील जनजीवनावर मोठा परिणाम झाला. अनेक रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहत होते. ठिकठिकाणी पाणीही साचले होते. शहरासह जिल्ह्यातही सर्वदूर पाऊस सुरू होता.
धरण क्षेत्रात तर केवळ जंगमहट्टी वगळता उर्वरित 15 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी सकाळी सात वाजेपर्यंत गेल्या 24 तासात अतिवृष्टी झाली. यामुळे धरणातील पाणीसाठ्यातही वाढ होत असून, धरणांतील विसर्गही कायम आहे. राधानगरी धरणाचे पाच, सहा व सातव्या क्रमांकांचे असे एकूण तीन दरवाजे खुले असून, त्यासह धरणातून एकूण 5 हजार 784 क्युसेक विसर्ग सुरू आहे. तुळशी धरणातून 1500, कासारीतून 770, कुंभीतून 720 आणि कोदे धरणातून 1059 क्युसेक विसर्ग सुरू असल्याने, त्याचा पंचगंगा नदी पातळीवर परिणाम जाणवत आहे.
पंचगंगेची पाणीपातळी कमी होत चालली होती. शुक्रवारी सकाळी ती 42.2 फुटांपर्यंत कमी झाली होती. मात्र, त्यानंतर सकाळी 11 वाजता पाणीपातळी 42.3 फुटांवर गेली. दुपारी 12 वाजता ती 42.4 फुटांवर गेली. दुपारी 12 ते रात्री आठ वाजेपर्यंत पाणीपातळी 42.4 फुटांवर स्थिर होती. यामुळे पुन्हा पातळी कमी होईल, असे वाटत असतानाच पुन्हा त्यात वाढ झाली. रात्री नऊ वाजता ती 43.5 फूट इतकी झाली.
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सरसरी 26.4 मि.मी. पाऊस झाला. आजरा येथे सर्वाधिक 50.9 मि.मी. पाऊस झाला. हातकणंगलेत 10.1 मि.मी., शिरोळमध्ये 4.6 मि.मी., पन्हाळ्यात 30 मि.मी., शाहूवाडीत 37 मि.मी., राधानगरीत 30.4 मि.मी., गगनबावड्यात 47.9 मि.मी., करवीरमध्ये 23.1 मि.मी., कागलमध्ये 19.1 मि.मी., गडहिंग्लजमध्ये 29.1 मि.मी., भुदरगडमध्ये 44.6 मि.मी., तर चंदगडमध्ये 27.1 मि.मी. पाऊस झाला.
जिल्ह्यातील 74 बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत. शिरोळ, भुदरगड, कागल तालुक्यांतही अनेक भागात अद्याप पूरस्थिती कायम आहे. अनेक रस्त्यांवर पाणी असल्याने त्यावरील वाहतूक बंदच आहे.