

गारगोटी : भेसळयुक्त दूध संस्थेच्या चर्चेवरून चेअरमन डोंगळे व गंगापुरातील महादेवराव महाडिक दूध संस्थेचे प्रतिनिधी, आमदार प्रकाश आबिटकर समर्थक तानाजी जाधव यांच्यात हमरीतुमरी झाली. सभासदांचा संताप पाहून गोकुळ दूध संघाच्या संचालकांना सभा गुंडाळण्याची वेळ आली. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने गारगोटी येथे आयोजित केलेल्या भुदरगड तालुका दूध संस्था प्रतिनिधी संपर्क सभेत हा प्रकार घडला. संपर्क सभा तब्बल एक तास उशिरा सुरू झाली. त्यामुळे संस्था प्रतिनिधी कंटाळून गेले होते.
भुदरगड तालुक्यातील चार दूध संस्थांचे भेसळयुक्त चार संस्थांच्या वरून बराच वेळ वादविवाद व चर्चा झाली. त्यातील भेसळयुक्त दूध संस्थांचे संकलन तडकाफडकी बंद करण्याचा आदेश चेअरमन डोंगळे यांनी दिला. त्यामुळे संतापलेल्या सभासदांनी चेअरमन यांची हुकूमशाही चालणार नाही. दूध उत्पादकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा एकनाथ देसाई, तानाजीराव जाधव यांच्यासह सभासदांनी दिला. दरम्यान, गोकुळ दूध संघ कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे लाखो दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. ही संस्था ऊर्जितावस्थेत राहण्यासाठी दूध उत्पादक बंधूंनी गोकुळचे महालक्ष्मी पशुखाद्य खरेदी करावे, असे आवाहन चेअरमन अरुण डोंगळे यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना केले.
माजी चेअरमन विश्वासराव पाटील यांनी दूध उत्पादक यांना गोकुळ संघामार्फत राबविण्यात येणार्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. संचालक रणजितसिंह पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये गोकुळच्या माध्यमातून राबविण्यात येणार्या विविध योजनांचा फायदा घ्यावा, असे सांगितले. संचालक नंदकुमार ढेंगे यांनी स्वागत केले. यावेळी संचालक राजेंद्र मोरे, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील, किसन चौगले, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, बाळासाहेब खाडे, चेतन नरके, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, श्रीमती अंजना रेडेकर, युवराज पाटील, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले आदींसह संस्था प्रतिनिधी उपस्थित होते. संचालक किसनराव चौगले यांनी आभार मानले.
गंगापूर येथील महादेवराव महाडिक दूध संस्थेचे प्रतिनिधी तानाजी जाधव म्हणाले, चेअरमन डोंगळे यांची भाषा हुकूमशाहीची होती. प्रतिनिधी प्रश्न विचारताच त्यांना गप्प बसवत होते. आमच्या संस्थेचे नाव महाडिक आहे, यात आमची काय चूक? डोंगळेंची भाषा ही दादागिरीची होती. विशेष म्हणजे, जाधव यांनी आपण आमदार प्रकाश आबिटकर यांचा कट्टर समर्थक असल्याचे सांगितले.
राधानगरी-भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर यांनीच गेली दोन वर्षे झाली 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याची वारंवार मागणी केली आहे; परंतु अद्याप पदरात पडलेले नाही. जिल्ह्यातील खासदार-आमदारांनी याकामी लक्ष घालून महापुराच्या कठीणप्रसंगी शेतकर्यांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.