

गुवाहाटी : स्कॉटलंडमध्ये ओव्हरटन ब्रीज नावाचा एक रहस्यमय पूल आहे. या पुलावरून खाली 50 फुटांवरील खडकांवर उडी मारून अनेक पक्ष्यांनी ‘आत्महत्या’ केल्याचे सांगितले जाते. आपल्या भारतातच असे एक गाव आहे जिथे पक्षी आत्महत्या करतात! आसामच्या बरेल पर्वतराजीत हे गाव आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात रोज सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत प्रवासी पक्ष्यांचा थवा या गावात येतो व रहस्यमयरित्या मरून जातो!
आसामच्या मि हासो जिल्ह्यातील जतिंगा गावात पक्षी असे आत्महत्या करीत असल्याने हे गाव सर्वत्र ओळखले जाते. केवळ स्थानिक पक्षीच नव्हे तर स्थलांतरीत पक्षीही याठिकाणी आत्महत्या करतात. अशा घटना इथे का घडतात याची अनेकवेळा तज्ज्ञांनी पाहणी केली आहे; मात्र त्याचा उलगडा अद्याप झालेला नाही. जतिंगा गावात दीड किलोमीटर लांबीचा एक रस्ता आहे. त्यावरून उड्डाण करीत असताना पक्षी अशी आत्महत्या करतात. सूर्यास्तानंतर शेकडो पक्षी वेगाने आकाशातून जमिनीकडे येतात आणि जमिनीला धडकून मृत्युमुखी पडतात. या प्रकाराची माहिती सुरुवातीला येथे राहत असलेल्या नागा या आदिवासी समुदायाला समजली होती. त्यामुळे त्यांनी भयग्रस्त होऊन येथील जमीन जैंतिया समुदायाला दिली. सन 1957 मध्ये जगाला या प्रकाराची माहिती समजली. ई.पी. गीई हे पक्षीतज्ज्ञ काही कामानिमित्त या गावात असताना त्यांनी ही घटना पाहिली व त्याचा उल्लेख त्यांनी ‘द वाईल्डलाईफ ऑफ इंडिया’ या आपल्या पुस्तकात केला. अनेक प्रयत्नांनंतरही आपल्याला या प्रकाराचे रहस्य उलगडता आले नाही, असे त्यांनी म्हटले.