कोल्हापूर

खतांचा तुटवडा दूर करण्यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना कराव्यात : राजू शेट्टी

मोहन कारंडे

जयसिंगपूर; पुढारी वृत्तसेवा : रशिया व युक्रेनच्या युध्दामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर रासायनिक खताचा तुटवडा निर्माण झाल्याने तसेच कच्चा मालाच्या आयात निर्यातीच्या विस्कळीतपणामुळे खताचे दर गगनाला भिडू लागले आहेत. यामुळे देशातील शेतक-याचे शेतीचे बजेट कोलमडू लागले आहे. केंद्र सरकारने शेतीतील पुढील संकटे लक्षात घेऊन उपाययोजना कराव्यात, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिल्ली येथील इंडिया हॅबिटीट सेंटरच्या राष्ट्रीय रासायनिक खताच्या परिषदेत व्यक्त केले.

यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, खरीप हंगामावर खतटंचाई निर्माण झाल्यास त्याचा मोठा परिणाम बाजरी, कडधान्ये, तेलबिया उत्पादनावर होईल. गहू, तांदूळ यांचेही उत्पादन घटेल. या परिस्थितीचा अभ्यास करणा-या देशांनी यापुर्वीच अन्नसाठे करण्यास सुरुवात केली आहे.  खरीप हंगाम देशाच्या अन्नसुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या हंगामात अन्नधान्य, एक तृतीयांश कडधान्ये आणि सुमारे दोन तृतीयांश तेलबियांचे उत्पादन होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात खतांची गरज भासणार आहे. रासायनिक खते किती धोकादायक असल्याचा प्रचार होत असला आणि तो जरी खरा असला तरी आज अन्नधान्य क्षेत्रात हा वापर कमी करणे व्यवहार्य नाही. रशिया आणि युक्रेनचे युध्द, वेगवेगळ्या देशात उद्भवलेला करोना, इतर देशांचे आपापसातले व्यवहार यांचा परिणाम आपल्या बांधावरही होत आहे. कितीही संकटे आली तरी जगाला अन्नधान्याचा पुरवठा करणारा आपला देश सरकारच्या मदतीने खतसंकटावरही मात करावे लागेल, असेही त्‍यांनी नमूद केले.

केंद्र सरकारकडून रासायनिक खताच्या किमती वाढवून कदाचित शेतक-यांना सेंद्रिय शेतीकडे वळविण्याचा प्रयत्न असेल मात्र यातून धान्याचे उत्पादन कमी होऊन अन्नसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. यामुळे १२५ कोटी जनतेला पुरेल एवढे धान्य पिकवून देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण करायचे असल्यास नॅनो टेक्नॅालॅाजिचे विद्राव्य खताची निर्मिती करून ड्रोनद्वारे औषध फवारणी करण्याचे तंत्रज्ञान सर्वत्र अवलंबिले पाहिजे. लहरी हवामान आणि खतांची टंचाई ही दोन्ही संकटे शेतशिवाराला पेलता न आल्यास मागणी आणि पुरवठ्याचे गणित बिघडून अन्नधान्याची टंचाई निर्माण होऊ शकते, असेही त्‍यांनी यावेळी सांगितले.

रूरल व्हाईस व सॅाक्रेटीस संस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या या परिषदेस अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे समन्वयक व्ही. एम. सिंग, योगेंद्र यादव, शेतकरी नेते राकेश टिकेत, मा. खा. अतुल अंजन, रामपाल जाट, काश्मीर (बारामुल्ला) चे शेतकरी मा. आमदार यावर मीर, अनिल घुळी, आदित्य चौधरी यांच्यासह देशातील विविध शेतकरी संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT