पुढारी ऑनलाईन डेस्क प्रसिध्द गायक केके यांचे काल रात्री निधन झालं. (K K Songs) के के यांनी५३ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. २३ ऑगस्ट, १९६८ साली दिल्लीमध्ये त्यांचा जन्म झाला हाेता. (K K Songs) के के यांचं संपूर्ण नाव कृष्णकुमार कुन्नथ. त्यांनी हिंदीसोबतच विविध भाषांमध्ये गाणी गायली.
केके यांनी तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली, आसामी आणि गुजराती भाषेतील चित्रपटातील गीतांना त्यांनी स्वर दिला.
केके यांना लहानपणी डॉक्टर व्हायचे होते. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या किरोरी माल महाविद्यालयात शिक्षण घेतले. दिल्ली विद्यापीठातून वाणिज्य शाखेत पदवी घेतल्यानंतर केके यांनी हॉटेलमध्ये काम केले. आठ महिन्यांनंतर हॉटेलमधील नोकरी सोडली.
के के लग्नानंतर सुमारे ३ वर्षांनी १९९४ मध्ये मायानगरी मुंबईत आले. आपल्या स्वप्नाच्या शोधात मुंबईत आलेल्या के के यांनी गायनाच्या दुनियेत ब्रेक शोधायला सुरुवात केली. के के यांना १९९४ मध्ये यूटीव्ही जाहिरातीतून ब्रेक मिळाला आणि त्यानंतर कृष्णकुमार कुननाथ यांचा बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक बनण्याचा प्रवास सुरू झाला.
'माचीस चित्रपटातील 'छोड आये हम' या गाण्याने के के यांना बॉलीवूडमध्ये ब्रेक मिळाला. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी एकापाठोपाठ एक सुपरहिट गाणी दिली. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी के के यांनी जवळपास ३ हजार ५०० जिंगल्स गायल्या हाेत्या.
केकेच्या लोकप्रिय गाण्यांबद्दल बोलायचे झाले तर 'यारों' खूप गाजले होते. सलमान खान, अजय देवगण आणि ऐश्वर्या राय यांचा चित्रपट हम दिल दे चुके सनम मधील 'तडप-तडप के इस दिल से' गाणे, बचना ए हसीनो मधील 'खुदा जाने', 'काइट्स'मधील 'जिंदगी दो पल की', 'जन्नत सा'मधील 'जरा'. , गँगस्टरचे गाणे 'तू ही मेरी शब है', शाहरुख खानच्या चित्रपट ओम शांती ओमचे 'आँखों में तेरी अजब सी' ही गाणी प्रचंड लोकप्रिय झाली.
बजरंगी भाईजान या चित्रपटातील 'तू जो मिला', इक्बालचे 'आशाये' आणि अजब प्रेम की गजब कहानीमधील 'मैं तेरी धडकन' या गाण्यालाही चांगली प्रसिद्धी मिळाली. केकेने हिंदीशिवाय बंगाली आणि इतर अनेक भाषांमधील गाण्यांनाही आपला आवाज दिला. दोन दशकांहून अधिक काळ संगीतप्रेमींच्या हृदयावर राज्य करणारा आवाज अचानक मंगळवारी नि:शब्द झाला आहे.