kolhapur : Ajit Pawar political news
मुदाळतिट्टा : पुढारी वृत्तसेवा
देशाच्या आणि राज्यांच्या विकासात सहकारी संस्थांच्या मोठे योगदान आहे. सहकारी बँकांनी स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर काही अमुलाग्र बदल स्वीकारणे गरजेचे आहे. सहकार चळवळ काळानुरूप बदलली पाहिजे. राज्यातील शेतकरी बांधवांनी नवीन वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
मुरगुड ता. कागल येथील विश्वनाथराव पाटील मुरगुड सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना भेटवस्तू प्रधान कार्यक्रम प्रसंगी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, शेतकरी बांधवांनी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ए आय या नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये करून दीडपट उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करावा. पारंपारिक शेती करण्यापेक्षा नव्या तंत्रज्ञानाचा वापर शेतीत करा. नव्या तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांना घेता यावा यासाठी बजेटमध्ये 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शेती बबत ज्या योजना आहेत त्या योजना राबवण्याच्या बाबत निधीची कमतरता पडू देणार नाही. साखर कारखाने भरपूर झाले आहेत. क्रेशींगची क्षमता भरमसाठ वाढवली आहे. साखर कारखाने जास्त काळ चालवायचे असतील तर उसाचे उत्पन्न वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी आधुनिकतेची कास धरणे गरजेचे आहे.
पवार म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांना शेतीपूरक उद्योग करण्याकरता दरवर्षी 5 हजार कोटी रुपये दरवर्षी याप्रमाणे पाच वर्षात 25 हजार कोटी रुपये शेतकऱ्याला देण्याचे नियोजन महायुतीच्या सरकारने केले आहे. मी अर्थमंत्री असे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही याची खात्री देतो.
अध्यक्ष भाषणात वैद्यकीय शिक्षण मंत्री नाम.हसन मुश्रीफ म्हणाले, सहकारी संस्था या स्वतःच्या मालकीच्या नसून त्या सभासदांच्या मालकीच्या आहेत. आपण त्या ठिकाणी विश्वस्त आहोत. या भावनेने काम करा. अतिशय पारदर्शक कारभार केल्याने या बँकेने 100 कोटी ठेवींचा टप्पा पार केला आहे. अगदी बँकेच्या स्थापनेपासून आजपर्यंत या परिसरातील सर्वसामान्यांच्या जीवनातील आधारवड म्हणून नावलौकिक प्राप्त केलेल्या या बँकेच्या शतकमहोत्सवी वर्षापर्यंत 200 कोटींच्या ठेवी व 25 शाखा व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करतो.
यावेळी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आदी मान्यवरांच्या हस्ते सभासदांना भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी येथील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास व बँकेसमोरील कै. विश्वनाथराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपमुख्यमंत्री पवार यांनी अभिवादन केले. अजित पवार, हसन मुश्रीफ यांचा शाल श्रीफळ कोल्हापुरी फेटा श्री अंबाबाईची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
स्वागत व प्रास्ताविक बँकेचे अध्यक्ष प्रवीणसिंह वि. पाटील यांनी केले यावेळी माजी आमदार संजय घाटगे, रिझर्व बँक ऑफ इंडियाचे निवृत्त अधिकारी अविनाश जोशी, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे अध्यक्ष शितल फराकटे यांची भाषणे झाली. यावेळी माजी आमदार के. पी. पाटील, गोकुळ चे माजी चेअरमन अरुण डोंगळे, शेतकरी संघाचे चेअरमन बाबासाहेब शिंदे, जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे, युवराज पाटील, भैया माने ,बाबासाहेब पाटील असुरलेकर, बिद्री चे उपाध्यक्ष मनोज फराकटे,अमरसिंह माने पाटील, सुहासिनीदेवी पाटील, नंदकुमार ढेंगे, दिग्विजय पाटील, सुधीर सावर्डेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास चौगले, बँकेचे सर्व संचालक मंडळ, सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी तर आभार उपाध्यक्ष वसंतराव शिंदे यांनी मानले.