

Vaishnavi Hagawane Death
वैष्णवी हगवणे यांचा छळ आणि मृत्यू प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली. या प्रकरणात फरार असलेले संशयित राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे यांना शुक्रवारी पहाटे अटक करण्यात आली. वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी मुलीच्या लग्नात ५१ तोळे सोने आणि फॉर्च्युनर कार भेट दिली होती. या शाही लग्न सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हजर राहिले होते. या लग्न सोहळ्याला अजित पवार उपस्थित राहिल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. यावरुन अजित पवार संतापले आहेत.
''मी लग्नाला गेलो. माझा फोटो काढला. त्यात माझा काय दोष? माझ्यावर असे आरोप होत असतील तर मी लग्नाला जाणार नाही. माझा दोष नसताना मला का दोषी धरताय?. माझा या प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही. तो केवळ पक्षाचा कार्यकर्ता होता. कायदा सर्वश्रेष्ठ आहे. कस्पटे कुटुंबियांच्या बाबतीत दुःखद घटना घडली. मी आज संध्याकाळी कस्पटे कुटुंबियांची भेट घेणार आहे.'' असे अजित पवार कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
हगवणे कुटुंबियातील जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई होईल. या प्रकरणी कोणतीही कमतरता ठेवली जाणार नाही. आम्ही कस्पटे परिवारासोबत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या ९ महिन्यांच्या बाळाला कस्पटे कुटुंबियांकडे देण्यात आले आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, दोन- तीन दिवस आई नसल्याने बाळ रडत होते. काल ते आजीच्या कुशीत झोपले.
राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन जीवन संपवले. पण तिच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळून आले आहेत. यामुळे सासरच्या लोकांनी तिचा खून केल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे. याप्रकरणी वैष्णवी यांचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांना अटक करण्यात आली. पण राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशील हे दोघे फरार होते. त्यांनाही आता अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राजेंद्र तुकाराम हगवणे (Rajendra Hagawane) आणि सुशील राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी केली.