Kolhapur rain 2025
कोल्हापूर : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाँधार पावसामुळे मे महिन्यातच राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे. जिल्ह्यात सर्वत्र वळवाने थैमान घातले आहे. मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांची पावसाने सरासरी ओलांडली असून, ४० टक्के जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे पंचगंगा नदी परिसरात पावसाळ्यापूर्वीच पुरसदृश स्थितीसारखा अनुभव कोल्हापूरकरांना येत आहे.
गेले तीन दिवस पडत असलेल्या दमदार पावसाने यावर्षी पावसाळ्यापूर्वी पहिल्यांदाच राजाराम बंधारा पंचगंगेच्या पाण्याखाली गेला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव कसबा बावड्याकडील बाजूस बॅरिकेट लावून रस्ता वाहतुकीस बंद केला आहे. बुधवारी सकाळपासून वळवाने जिल्ह्याला झोडपून काढले आहे. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास पंचगंगा नदीचे पाणी राजाराम बंधाऱ्यावरून वाहू लागले. पाणी पातळी दुपारी अडीचच्या सुमारास १६ फूटांवर पोहोचली होती.
कोल्हापुरात १ मार्च ते २२ मेदरम्यान सरासरी ४५.८ मि.मी. पाऊस कोसळतो. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसाने ही सरासरी ओलांडली आहे. या कालावधीत ६३.८ मि.मी. पाऊस झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. १२ मार्च २०२५ पासून १४ मे २०२५ पर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस होता. यानंतर आठच दिवसांत पावासाने तीन महिन्यांची सरासरी ओलांडली.