केज : तालुक्यातील एका गावात ३० वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग केल्यानंतर तिच्या पतीने जाब विचारताच त्याच्या डोक्यात लोखंडी गजाने वार करून गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २७ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे २ वाजता पीडित महिला घरात एकटी असताना आबा गोरख गायकवाड याने घरात घुसून "तू मला आवडतेस" असे म्हणत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यानंतर तिच्याशी झोंबाझोंबी करत पदर ओढून विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
घडलेला प्रकार महिलेने आपल्या पतीला सांगितल्यानंतर २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पतीने आरोपीकडे जाब विचारण्यासाठी गेल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी गोरख उत्तरेश्वर गायकवाड याने लोखंडी गजाने पतीच्या डोक्यावर वार करून गंभीर दुखापत केली. यानंतर आबा गोरख गायकवाड आणि गोरख उत्तरेश्वर गायकवाड या दोघांनी संगनमत करून पीडित महिला व तिच्या पतीला चापट-बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केल्याचीही तक्रार करण्यात आली आहे.
पीडित महिलेच्या तक्रारीवरून केज पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५४६/२०२६ नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५, ११५(२), ११८(१), ३३३ आणि ३५२ अन्वये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस जमादार पल्लवी तरकसे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.