Pune Crime News: मांसाहारी जेवणावरून वाद; मारहाणीत मुलाचा मृत्यू; आई-वडिलांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

ही घटना त्यांच्या राहत्या घरी २४ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजल्यानंतर पहाटे साडेचार वाजण्याच्या दरम्यान घडली.
Crime
CrimePudhari
Published on
Updated on

पुणे: श्रावणात मद्यप्राशन करून आल्यानंतर मांसाहारी जेवण मागितल्याच्या कारणातून झालेल्या वादात वडिलांनी मुलाला मारहाण केली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, हा प्रकार आईने लपवून ठेवला म्हणून दोघांविरुद्ध वारजे माळवाडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

महेश गायकवाड (वय ३०, रा. रामनगर, वारजे माळवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर वडील भागवत सूर्यभान गायकवाड (वय ६४) आणि आई पार्वती भागवत गायकवाड (वय ६०) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत त्यांचा दुसरा मुलगा गणेश भागवत गायकवाड (वय ३४, रा. रामनगर, वारजे माळवाडी) याने फिर्याद दिली आहे. ही घटना त्यांच्या राहत्या घरी २४ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजल्यानंतर पहाटे साडेचार वाजण्याच्या दरम्यान घडली.

Crime
Ganeshotsav Sound System Rules: ध्वनियंत्रणेबाबत चार टॉप, चार बेसवर ‘तह’; ८० टक्के मंडळांची तयारी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश गायकवाड हे पेंटिंगचे काम करतात. त्यांचे आईवडील व लहान भाऊ शेजारीच वेगवेगळे राहतात. त्यांचा लहान भाऊ महेश गायकवाड हा काही काम धंदा करत नाही. महेश याचा १० वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्याच्या दारूच्या व्यसनापायी त्याची पत्नी दोन मुलांना घेऊन माहेरी निघून गेली.

त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला. महेश हा एकटा राहत असून, तो जेवणासाठी आईवडिलांकडे जातो. तो काहीच कामधंदा करीत नसून दारू पिऊन येतो, या कारणावरून त्याचे वडिलांबरोबर सतत भांडणे होत होती. दारू पिऊन आल्यावर त्याला जेवणासाठी कायम मांसाहार लागत असे. श्रावण सुरू असल्याने आईवडील मांसाहार बनवून देत नसल्याने त्यांच्यात वादावादी होत होती.

Crime
Banana Price Increase: 'गरिबांचे फळ' महागले! केळी डझनाला ८० रुपये; उपवास, कार्यक्रमांमुळे मागणीत वाढ

२४ ऑगस्ट रोजी महेश हा रात्री दारू पिऊन आला. तो रात्री साडेदहा वाजता घरी गेला. त्यानंतर पहाटे साडेचार वाजता त्यांची आई पार्वती हिने फिर्यादी गणेश यांना झोपेतून उठवून महेश हा उठत नाही. त्याचे शरीर पूर्ण थंड पडलेले आहे, तू बघ जरा त्याला काय झाले आहे, असे सांगितले. त्यांनी आईबरोबर महेशच्या घरी जाऊन पाहिले.

महेश उताणा झोपलेला दिसून आला. त्याला उठवण्यासाठी डोक्याखाली हात घातला असता त्यांच्या हाताला रक्त लागले. तसेच त्याच्या डोक्याला, नाकाला व तोंडाला जखमा झालेल्या दिसत होत्या. गळ्याभोवती व्रण असल्याचे गणेश यांना दिसले. त्यांनी नातेवाईकांना बोलावून घेतले. नातेवाईकांनी पोलिसांना याची माहिती कळविली. शवविच्छेदनात डॉक्टरांनी महेशचा मृत्यू श्वसनावरोधामुळे तसेच डोक्याच्या व चेहर्‍यावरील जखमामुळे झाला असल्याचे सांगितले.

दारू पिऊन आल्यावर मांसाहारी जेवणावरून वडील भागवत गायकवाड व महेश यांच्यात भांडण झाले असल्याने वडिलांनी त्याला डोक्यावर, तोंडावर मारहाण करून जखमी केले व गळा दाबून त्याला जिवे मारले असावे. तसेच झालेला प्रकार हा कसा झाला, हे आई पार्वती व वडील भागवत गायकवाड यांनी लपवून ठेवला असल्याचे फिर्यादी गणेश गायकवाड यांना वाटत आहे. पोलीस निरीक्षक प्रकाश देंडे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news