संशयित आरोपी दिनेशकुमार साह Pudhari Photo
कोल्हापूर

शिये येथे बलात्कार करून दहावर्षीय चिमुरडीचा खून

पुढारी वृत्तसेवा

शिरोली एमआयडीसी : पुढारी वृत्तसेवा

बिहारमधून मोलमजुरीसाठी आलेल्या परप्रांतीय कुटुंबातील दहावर्षीय चिमुरडीवर शेतात बलात्कार करून अमानुषपणे गळा घोटून खून केल्याची घटना शिये (ता. करवीर) येथील रामनगर परिसरात गुरुवारी सकाळी उघडकीस आली. माणुसकीला काळिमा फासणार्‍या आणि अंगावर शहारे आणणार्‍या या क्रूर घटनेमुळे शियेसह पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी नराधम मामा दिनेशकुमार केशनाथ साह (25, सध्या रा. दत्तनगर शिये, मूळ बिहार) याला रात्री उशिरा बेड्या ठोकण्यात आल्या. करवीर तालुक्यातील शिये येथे बालिकेवर अत्याचार करून नराधमाने पीडितेचा गळा घोटून जीव घेतल्याने संतप्त पडसाद उमटत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली.

शिये येथील चिमुरडीवर अत्याचार करून तिचा अमानुष खून झाल्याची माहिती गुरुवारी सकाळी शहर व जिल्ह्यात वार्‍यासारखी पसरताच घटनास्थळी ग्रामस्थांसह बघ्यांची मोठी गर्दी झाली. पोलिसांकडून घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. चिमुरडीच्या घराच्या पिछाडीस 500 मीटर अंतरावर असलेल्या शेतातील ऊस पिकाच्या दिशेने बुधवारी दुपारी 2.10 वाजता संशयित हा पीडित मुलीला घेऊन जात असताना दोन फुटेज पोलिसांना उपलब्ध झाले आहेत. बिहारमधील कैमुरे जिल्ह्यातील सवार येथील कुटुंबीय तीन वर्षांपूर्वी उदरनिर्वाहासाठी शियेतील दत्तनगर येथील खुटाळे यांच्या खोलीत भाड्याने वास्तव्याला आले. या दाम्पत्याला 3 मुली आणि दोन मुले अशी 5 अपत्ये आहेत. पाचही भावंडांत दुर्दैवी बालिका थोरली!

पीडित मुलीचे आई-वडील गोकुळ शिरगाव येथील फौंड्रीमध्ये कामाला आहेत. पीडित मुलगी कुटुंबीयांची ज्येष्ठ कन्या... आई-वडील कामावर गेल्यानंतर ती छोट्या चार भावंडांचा सांभाळ करीत असे. बुधवारी जेवण आटोपल्यावर दुपारी 1 वाजता ती भावंडांसह अंगणात खेळत बसली होती. यावेळी तिचा 25 वर्षीय मामा घरातच होता. दुपारी जेवण केल्यानंतर आपण झोपी गेल्याचे तो सांगतो. नेमके याच काळात पीडिता घरातून बेपत्ता झाली. सायंकाळी सहा वाजता मुलीची आई कामावरून घरी आली. यावेळी मुलगी घरात दिसत नसल्याने तिने चौकशी सुरू केली. घरासह परिसरात शोध घेतला. पण तिचा सुगावा लागला नाही. घराजवळ राहणार्‍या मुलीच्या मैत्रिणीकडेही चौकशी केली.

अपहृत मुलीचा शोध सुरू असतानाच मामाची कामावर हजेरी

अचानक बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध सुरू असतानाच सायंकाळी तिचा मामा कामावर गेला. शेजारी राहणारे निर्मला पाटील, विलास पाटील, वंदना पाटील, आप्पासाहेब शिंदे, कांतिसिंह पाटील, सौरभ पाटील यांनी रात्री दहापर्यंत शियेसह परिसर पालथा घातला. तरीही मुलीचा मागमूस लागला नाही. नागरिकांनी रात्री उशिरा शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक पंकज गिरी यांच्याशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली.

श्वानपथकासह फॉरेन्सिक लॅबचे पथक दाखल

सहायक निरीक्षक गिरीसह पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. गुरुवारी पहाटेपर्यंत मुलीचा शोध सुरू होता. मात्र बालिकेचा थांगपत्ता लागला नाही. गिरी यांनी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याशी संपर्क साधल्यानंतर दुपारी बाराच्या सुमाराला श्वानपथक व फॉरेन्सिक लॅबचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

श्वानपथकाने लावला छडा

वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या उपस्थितीत श्वानपथकाला बेपत्ता बालिकेच्या कपड्याचा वास देण्यात आला. त्याआधारे श्वानाने घराच्या पिछाडीस 500 मीटर अंतरापर्यंत माग काढला. उसाच्या शेताजवळ श्वान काही काळ घुटमळले. त्यानंतर ते सुसाट वेगाने पळत सुटले. शेताच्या बांध्यापासून 450 फुटांवर ओढ्याजवळ जाऊन थांबले.

ओढ्याच्या काठालगत मृतदेह; शरीरावर जखमांचे व-ण

ओढ्याच्या काठावर गवतात पीडितेचा मृतदेह आढळून आला. मांडी, हात, गळा, डोळ्याजवळ जखमांचे व-ण दिसून आले. शिवाय दहा ते बारा फूट अंतरावर तिचे कपडे आढळले. प्रतिकार करताना मुलीच्या हातावरही ओरखडल्याचे व-ण दिसून आले.

ग्रामस्थांसह महिलांची गर्दी

बेपत्ता बालिकेवर बलात्कार करून नराधमाने खून केल्याची बातमी शियेसह परिसरात वार्‍यासारखी पसरली. क्षणार्धात घटनास्थळी महिलांसह नागरिकांची गर्दी झाली. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, रवींद्रकुमार कळमकर, तानाजी सावंत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. परिसरातील नागरिकांकडेही चौकशी केली. महेंद्र पंडित यांनी स्वत: सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली.

बालिकेचा मामा पोलिसांच्या ताब्यात

पीडित मुलीचा शोध सुरू असतानाच एव्हाना मुलीच्या आईचा आक्रोश सुरू असतानाही मुलीचा मामा बुधवारी सायंकाळी कामावर गेल्याचे समजल्यावर पोलिस अधिकार्‍यांना त्याच्या वर्तनाचा संशय आला. रात्री उशिरा त्याला शिरोली पोलिसांनी कामावरूनच ताब्यात घेतले. सकाळपासूनच पोलिस त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार करीत आहेत.

संतप्त पडसाद ; शिवसेनेची निदर्शने राजीनाम्याच्या मागणीसाठीघोषणाबाजी

दरम्यान, मुलीवरील अत्याचार व अमानुष खुनाच्या घटनेनंतर शहरात संतापाची लाट उसळली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, विजय देवणे, शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह संतप्त शिवसैनिकांनी शासकीय रुग्णालय परिसरात जोरदार घोषणाबाजी करून मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. वरिष्ठ पोलिस अधिकारी व शासकीय रुग्णालयाच्या अधिकार्‍यांवर टीकेचा भडीमार करून त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. यावेळी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

रात्री उशिरापर्यंत उत्तरीय तपासणी

बालिकेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. वरिष्ठ वैद्यकीय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत उत्तरीय तपासणीची प्रक्रिया करण्यात आली. त्याचा अहवाल रात्री उशिरा तपासाधिकार्‍याकडे पाठविण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT