संतापजनक ! तडीपार असून शहरात येऊन केले मुलीवर अत्याचार

Crime news : 21 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
21 years of hard labor for sex offender
लैंगिक अत्याचार करणार्‍या नराधमाला 21 वर्षांची सक्तमजुरीFile Photo
Published on
Updated on

तडीपार केलेले असतानाही शहरात येऊन अवघ्या पावणेचार वर्षांच्या मुलीला टेकडीवर नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्‍या नराधमाला 21 वर्षांची सक्तमजुरी व 75 हजार रुपयांचा दंड लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या (पोक्सो) न्यायालयाने ठोठावला. विशेष न्यायाधीश के. पी. क्षीरसागर यांनी हा निकाल दिला.

उच्चाप्पा लिंगाप्पा मंगळूर (वय 30, रा. चिंचवड) असे शिक्षा झालेल्या दोषीचे नाव आहे. त्याच्याविरोधात पीडित मुलीच्या वडिलांनी चिंचवड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. ही घटना 2 ऑक्टोबर 2018 रोजी बिजलीनगर येथील टेकडीवर घडली. आरोपी उच्चाप्पाला तत्कालीन पुणे शहर आयुक्तालय व पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार करण्यात आले होते. मात्र, तो तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून शहरात आला. पीडित मुलगी ही घरासमोर अंगणवाडीच्या मैदानात खेळत असताना आरोपीने तिला टेकडीवर नेत लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले.

या खटल्यात विशेष सरकारी वकील नितीन कोंघे यांनी काम पाहिले. त्यांनी सरकार पक्षातर्फे दहा साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडित मुलीसह प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीने त्याची वासना शमविण्यासाठी हा घृणास्पद गुन्हा केला आहे. त्यामुळे पीडितेला शारीरिक व मानसिक धक्का बसला आहे. आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता कोणतीही दयामाया न दाखविता त्याला कठोर शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील नितीन कोंघे यांनी केला.

सरकार पक्ष व बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने आरोपीला कठोर शिक्षा सुनावली, तसेच पीडितेला भरपाई देण्याचे आदेश पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला दिले. चिंचवड ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र कोळी, हवालदार दिनेश बांबळे यांनी न्यायालयाच्या कामकाजात मदत केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news