नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा
कोलकाता आरजी कार रुग्णालयातील डॉक्टर तरुणी बलात्कार आणि हत्या प्रकरणी केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला. या घटनेतील पिडीतेचे सर्व फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावरुन हटवण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत सरकारने हा आदेश जारी केला आहे. कोणत्याही सोशल मीडियावर असे फोटो दिसल्यास कारवाई केली जाईल, असे सरकारने स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयात २० ऑगस्ट २०२४ रोजी, या घटना प्रकरणी सुनावणी झाली. या सुनावणीवेळी पीडीतेची ओळख सोशल मीडियावर होत असल्याचे न्यायालयाने नमूद करुन खंत व्यक्त केली. सर्व सोशल मीडियावरुन, इलेक्ट्रॉनिक माध्यमांवरुन पिडीतेचे चित्रण करणारे फोटो आणि व्हिडिओ तसेच ओळखीचे सर्व संकेत ताबडतोब काढून टाकण्यात यावेत, असा निर्देश दिले. त्यानुसार केंद्र सरकारने हा आदेश जारी केला. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने सर्व सोशल मीडिया कंपन्यांना अशा संवेदनशील माहितीचा प्रसार करू नये असे निर्देश दिले आहेत.