रेल्वेत महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करणार्या तरुणाला न्यायालयाने सोमवारी ३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना १९ मार्च २०२० रोजी मंगळूर-मुंबई एक्सप्रेसमधून पीडिता गोवा ते मुंबई प्रवास करताना रत्नागिरी रेल्वेस्टेशनवर घडली होती.
राजेश महेश्वर सिंग (वय २२, रा. छत्तीसगड) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात पीडितेने दिलेल्या तक्रारीनूसार, पीडिता आपल्या बहिणीसोबत १९ मार्च २०२० रोजी मंगलोर-मंबई एक्सप्रेसने गोवा ते मुंबई असा प्रवास करत होती. प्रवासादरम्यान त्यांची रेल्वे रत्नागिरी रेल्वेस्टेशनवर थांबली असता पीडितेची बहिण रेल्वेतील प्रसाधनगृहात गेली असल्याने पीडिता प्रसाधनगृहाबाहेर उभी होती.त्यावेळी बाजुला उभ्या असलेल्या राजेशने पीडितेला रेल्वेत खाली पाडून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.
पीडितेने आरडाओरड केली असता रेल्वेतील इतर प्रवासी आणि पिडीतेच्या बहिणीने प्रसाधनगृहातून बाहेर येत राजेशला पकडले. रेल्वे पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी राजेशला ताब्यात घेतले.दरम्यान रेल्वे रत्नागिरी रेल्वेस्टेशनमधून पुढे निघाल्याने पिडीतेने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार न देता तिने रेल्वे पोलिसांना सांगून ठाणे पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानंतर राजेशला रेल्वे पोलिसांनी ठाणे पोलिसांसमोर हजर करून नंतर रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देत हा गुन्हा वर्ग करण्यात आला होता. हा खटला न्यायालयात सुरु होता.
याप्रकरणी सरकारी पक्षातर्फे अॅड. प्रज्ञा तिवरेकर, अॅड. विद्यानंद जोग यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीला भादंवि कलम ३५४ (अ),(ब) नूसार ३ वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड तो न भरल्यास १५ दिवस साध्या कैदेची शिक्षा सुनावली. या खटल्यात ग्रामीणचे तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक ए.एन.पाटील, पोलिस हेड कॉन्स्टेबल वाजे, पोलिस हेड कॉन्स्टेबल दुर्वास सावंत, पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलिस फौजदार अनंत जाधव, मदतनीस म्हणून महिला पोलिस नाईक संजीवनी मोरे यांनी काम पाहिले.