कोकण

गणपतीपुळे ते रत्नागिरी जेट बोट सुरू होणार : ना. उदय सामंत

Shambhuraj Pachindre

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

कोरोनामुळे गेली दोन वर्षे विकास कामांना काही प्रमाणात ब्रेक लागला होता. मात्र, महाविकास आघाडी शासनाने यावेळी कोकणाला भरभरून निधी दिल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. रत्नागिरीतील रखडलेले जिल्हा क्रीडा संकुल, त्याचप्रमाणे सायन्स सेंटर, म्युझिकल गार्डन, कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक यासाठी शासनाने कोट्यवधींची तरतूद केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे रत्नागिरी-गणपतीपुळे अशी जेटबोट सेवाही सुरू होणार आहे.

रत्नागिरी दौर्‍यावर आलेल्या ना. सामंत यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मतदारसंघासह जिल्ह्यातील विविध कामांना आघाडी सरकारने केलेल्या निधीच्या तरतुदीची माहिती दिली. रत्नागिरीतील मिर्‍या बंधार्‍यावर मुंबईतील मरिन ड्राईव्हसारखे पर्यटनद़ृष्ट्या विकास करण्यासाठी 41 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.

लोकमान्य टिळक अध्यासन केंद्रासाठी दोन कोटी रुपये, तालुक्यातील धूपप्रतिबंधक बंधार्‍यांसाठी 20 कोटी रुपये, महिला रुग्णालय अपग्रेडेशन, सिव्हील व जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयातील अग्नीशमन यंत्रणेसाठी सुमारे नऊ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज ग्रंथालयासाठी 12 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

पर्यटनवाढीसाठी गणपतीपुळे रत्नागिरी व परत गणपतीपुळे अशी जेट बोट सेवाही सुरु होणार आहे. त्यामुळे रत्नागिरी-गणपतीपुळे हा प्रवास अवघ्या 24 मिनिटात होणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले. तारांगणाजवळ सायन्स सेंटर उभारले जाणार असून दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. म्युझिकल गार्डनसाठी पाच कोटी, भाट्ये, आरे -वारे व पावसच्या विकासासाठी पाच कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.

रत्नागिरी शहराच्या खालील भागासाठी 500 सीटच नाट्यगृह मंजूर झाले आहे. त्याचप्रमाणे मांडवीकडे जाणार्‍या गटारासाठी दीड कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा क्रीडा संकुलचा प्रश्न गेली पाच वर्ष पडून आहे. यासाठी पाच कोटीच्या निधीची तरतूद झाल्याने येथील मैदानाचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममधील मैदानासाठी दोन कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

विमानतळासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यात 70 कोटी भूसंपादनासाठी तर 30 कोटी रुपये इमारतीसाठी मिळणार आहेत. जिल्ह्यातील रस्त्यांसाठी 160 कोटी तर रत्नदुर्ग किल्ल्यावरील शिवसृष्टीसाठी पाच कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
-उदय सामंत,
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, महाराष्ट्र

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT