कुडाळ : गणेशोत्सव काळात व्रतस्थ राहिलेल्या चाकरमान्यांसह स्थानिक नागरिकांनी बुधवारी मोठ्या प्रमाणावर मासळी खरेदी केली.
गणेशोत्सव काळात सर्वसाधारणपणे मासाहार वर्ज्य केला जातो. या व्रतपूर्तीमुळे मासे खाण्याची उत्सुकता अधिक होती. विशेषतः गावी आलेले चाकरमानी आणि घरगुती बाप्पांचे विसर्जन करून मोकळे झालेले अनेकजण थेट मच्छी मार्केटमध्ये दाखल झाले.
सकाळपासूनच मच्छी मार्केटमध्ये मासे खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ वाढत गेली. सुरमई, पापलेट, बांगडा, कोळंबी, बोंबील, सरंगा, पेडवा, मोरी, सौदाळा, यांसारख्या विविध प्रकारची ताजी मासळी मोठ्या प्रमाणात मार्केट मध्ये उपलब्ध होती. माशांचा दरही समाधानकारक होता.
चिकन व मटण खरेदीलाही खवय्यांची पसंती होती. काही जणांनी फॅमिलीसह तर हॉटेलमध्ये जाऊन जेवणाचा बेत आखला होता. वाढलेल्या मागणीमुळे मच्छी विक्रेत्यांची चांगली कमाई झाली.
दीड, पाच आणि सात दिवसांच्या घरगुती गणपती बाप्पांचे विसर्जन उत्साहात झाल्यानंतर बुधवारी कुडाळसह जिल्ह्यातील बहुतांश मच्छी मार्केटमध्ये खवय्यांची मोठी झुंबड उसळली.