रत्नागिरी

रत्नागिरी: गोळप येथील रखवालदार सख्ख्या भावांच्या खून प्रकरणी एकाला अटक

अविनाश सुतार

रत्नागिरी: पुढारी वृत्तसेवा:  दारुच्या नशेत शिवीगाळ केल्याच्या रागातून तालुक्यातील गोळप मुस्लिम मोहल्ला येथील आंबा बागेत रखवालदार म्हणून काम करणार्‍या दोन सख्ख्या भावांचा निर्घृण खून करणार्‍या संशयित आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.

सरनकुमार उर्फ गोपाळ शशीराम विश्वकर्मा (वय ५८, मूळ रा. नेपाळ, सध्या रा. गोळप, रत्नागिरी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. सरन कुमार हा बाजूच्याच बागेत कामाला होता. दि. २९ एप्रिलरोजी सायंकाळी खडकबहाद्दूर बलराम थापा क्षेत्री (वय 72), भक्तबहाद्दूर बलराम थापा क्षेत्री (वय 67, दोन्ही मूळ रा. कैलाली, नेपाळ सध्या रा. गोळप, मुस्लिमवाडी, रत्नागिरी) या दोन नेपाळी रखवालदार भावांसह सरन कुमार विश्वकर्मा दारु पिण्यासाठी गेला होता.

दारु पिऊन झाल्यानंतर रात्री हे तिघेही बागेत आले. त्याठिकाणी काही कारणांवरुन त्यांच्यात वाद झाला. या वादातून त्या दोघांनी सरन कुमारला शिवीगाळ केली. या रागातून त्याने धारदार हत्यार, लाकडी दांडका आणि चिर्‍याने गंभीर दुखापती करुन त्यांचा निर्घृण खून केल्याची माहिती मिळत आहे.

हे दोघेही रखवालदार भाऊ मुसद्दीक मुराद मुकादम (रा. रनपार गोळप, रत्नागिरी) यांनी ईनामदार यांच्याकडून कराराने घेतलेल्या आंबा बागेत रखवालदार म्हणून कामाला होते. या दोन्ही भावांचा खून झाल्याची बाब दि. 30 एप्रिलरोजी सकाळी 8.15 च्या सुमारास मुसद्दीक मुकादम यांचा अन्य एक कामगार बागेत आला असताना उघडकीस आली होती.

याप्रकरणी तपास करताना पोलिसांनी गावातील इतर गुरख्यांची चौकशी केली असता त्यांना सरन कुमारच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या गुन्ह्यात त्याचे अन्य साथीदार आहेत का ? याचाही पोलीस तपास करत आहेत.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT