खेड : तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरातील श्रेयाब केमिकल कंपनीने विषारी रासायनिक राख कंपनीलगतच्या मोकळ्या जागेत उघड्यावर टाकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या प्रकारामुळे परिसरातील पर्यावरणासह स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित कंपनीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सध्या पावसाळा सुरू असल्याने उघड्यावर टाकण्यात आलेली रासायनिक राख पावसाच्या पाण्यात मिसळून परिसरात पसरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरात मुक्तपणे फिरणाऱ्या जनावरांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, याच भागात जलजीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे काम सुरू आहे. विषारी राखेतील रसायने पावसाच्या पाण्यासोबत वाहून पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये मिसळल्यास स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित कंपनीवर पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कठोर कारवाई करावी, तसेच परिसरातील माती व पाण्याचे नमुने तपासून नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षा सुनिश्चित करावी, अशी मागणी संजय आखाडे यांनी प्रशासनाकडे केली आहे. याबाबत कंपनी व्यवस्थापनाकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
दरम्यान, या आरोपांबाबत संबंधित कंपनी किंवा प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडूनही केली जात आहे.