Hotel Kitchen Hygiene: बरबटलेले भटारखाने! पालींच्या लेंड्या, जळमटे अन् मळलेले हात

तळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलाची अवस्था
Hotel Kitchen Hygiene
Hotel Kitchen HygienePudhari
Published on
Updated on

बजरंग मासाळ

पिंपरी: हॉटेलमध्ये गेल्यावर थंडगार वातानुकूलित वातावरण, आकर्षक सजावट आणि चमचमीत पदार्थ दिसतात. मात्र, याच हॉटेलच्या भटारखान्यात पाऊल टाकताच समोर येणारे चित्र धक्कादायक आहे.

पालींच्या लेंड्या, जळमटे, मळलेल्या हातांनी तयार होणारे अन्न, चपला घालून स्वयंपाकघरात सुरू असलेली वर्दळ, जमिनीवर ठेवलेली अन्नाची भांडी आणि स्वच्छतेच्या नियमांचा उघडपणे होणारा भंग… हे दृश्य एखाद्या पडझड झालेल्या इमारतीचे नसून, शहरातील काही हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी आणि खाद्य आस्थापनांच्या भटारखान्यातील आहे. त्यामुळे ग्राहकांच्या ताटात नेमके काय वाढले जात आहे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

Hotel Kitchen Hygiene
Pawana River Pollution: थेरगाव केजुदेवी बंधाऱ्यात पाणी फेसाळले; पवना नदी प्रदूषणावर नागरिकांचा संताप

चमकदार डायनिंग, पण किचनमध्ये वेगळेच वास्तव

दैनिक पुढारीच्या प्रतिनिधीने शहरातील विविध हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे, बेकरी, कॅफे, फूड कोर्ट आणि क्लाऊड किचन परिसराची पाहणी केली. ग्राहकांसाठी आकर्षक डायनिंग हॉल तयार करण्यात आले असले, तरी काही ठिकाणी स्वयंपाकघरात अस्वच्छ फरशी, ओलसर भिंती, उघड्यावर ठेवलेले अन्न, कच्चे आणि शिजलेले पदार्थ एकत्र ठेवणे, पालींच्या लेंड्या, जळमटे, चपला घालून किचनमध्ये वावरणारे कर्मचारी, जमिनीवर ठेवलेली अन्नाची भांडी आणि स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले.

एक्सपायरी माल, डबल शिक्के अन्‌ काळपट तेलाचा वापर

पाहणीत काही बेकरी आणि खाद्य आस्थापनांमध्ये मुदत संपलेले (एक्सपायरी डेट) पदार्थ विक्रीसाठी ठेवलेले दिसले. काही उत्पादनांवर मूळ माहिती झाकण्यासाठी डबल-डबल शिक्के मारल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. काही ठिकाणी नव्या तारखेचे स्टिकर लावून उत्पादनाची तारीख बदलण्याचे प्रयत्नही आढळले. तळणीसाठी वारंवार वापरल्याने काळपट झालेल्या तेलाचाही वापर होत असल्याचे निदर्शनास आले. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अशा तेलाचा सातत्याने वापर आरोग्यासाठी घातक ठरू शकतो.

Hotel Kitchen Hygiene
PCMC Property Tax Discount: पिंपरी-चिंचवडमध्ये मालमत्ताकरावर 50% पर्यंत सवलत; 30 जूनपर्यंत लाभ घेण्याचे आवाहन

नागरिकांनीही रहावे सतर्क

नियम बनवणे ही प्रशासनाची जबाबदारी असली, तरी त्यांची अंमलबजावणी आणि जागरूक ग्राहक तितकेच महत्त्वाचे आहेत. ग्राहकांनी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण परवाना, स्वच्छता आणि अन्नाचा दर्जा तपासून संशयास्पद प्रकार आढळल्यास एफडीएकडे या 1800222365 क्रमांकांवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

एफडीएचे कठोर नियम; अंमलबजावणीचे आव्हान

अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे, बेकरी, मिठाई दुकाने, केटरिंग, फूड कोर्ट, ज्यूस बार, क्लाऊड किचन आणि ऑनलाइन फूड व्यवसायांसाठी कठोर नियम लागू केले आहेत. वैध भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण परवाना, सुरक्षित पिण्याचे पाणी, मेनूमध्ये कॅलरी व अॅलर्जनची माहिती, तळणीच्या तेलाचा पुनर्वापर बंद, प्रशिक्षित कर्मचारी, तापमान नियंत्रण, स्वच्छ गणवेश आणि नियमित वैद्यकीय तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे.

उपाययोजना

  • सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे, क्लाऊड किचन व बेकरींची नियमित तपासणी करावी

  • वैध भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण परवाना दर्शनी भागात लावणे बंधनकारक करावे स्वयंपाकघरातील स्वच्छतेचे त्रैमासिक ऑडिट करावे

  • तळणीच्या तेलाची टीपीसी मीटरद्वारे नियमित तपासणी करावी

  • अन्न हाताळणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची वार्षिक वैद्यकीय तपासणी करावी

  • मेनू कार्डवर कॅलरी, अॅलर्जन तसेच शाकाहारी-मांसाहारी माहिती स्पष्टपणे नमूद करणे अनिवार्य करावे

  • क्लाऊड किचन आणि ऑनलाइन फूड डिलिव्हरी केंद्रांचे स्वतंत्र ऑडिट करावे

  • नियमांचे पालन करणाऱ्या हॉटेल्सना सेफ फूड रेटिंग किंवा स्टार ग्रेडिंग देऊन ग्राहकांना सुरक्षित आस्थापना निवडणे सोपे करावे

ऑनलाइन फूडचा ट्रेंड पण नियंत्रण कुठे?

ऑनलाइन फूड डिलिव्हरीचा वापर वाढत असताना ग्राहकांच्या घरी पोहोचणारे अन्न कोणत्या क्लाऊड किचनमध्ये तयार झाले, ते योग्य तापमानात ठेवले गेले का, पॅकेजिंग सुरक्षित आहे का, याची माहिती ग्राहकांना मिळत नाही. त्यामुळे या क्षेत्रावर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.

प्रशिक्षित कर्मचारी की फक्त मनुष्यबळ?

काही ठिकाणी कर्मचारी हातमोजे, टोपी किंवा स्वच्छ गणवेशाशिवाय अन्न तयार करताना दिसले. नियमित वैद्यकीय तपासणी, अन्न सुरक्षा प्रशिक्षण आणि वैयक्तिक स्वच्छतेच्या नियमांचे पालन होत नसल्याचेही पाहणीत स्पष्ट झाले. अन्न हाताळणाऱ्या एका निष्काळजी कर्मचाऱ्यामुळे शेकडो ग्राहकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही खाद्य आस्थापनाची गय केली जाणार नाही. सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी, ढाबे आणि क्लाऊड किचन यांनी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण व एफडीएचे नियम काटेकोरपणे पाळणे बंधनकारक आहे. नागरिकांना अस्वच्छता, कालबाह्य अन्नपदार्थ, भेसळ किंवा नियमभंग आढळल्यास त्यांनी तातडीने एफडीएच्या टोल-फ्री क्रमांक 1800-22-2365 वर तक्रार नोंदवावी. प्रत्येक तक्रारीची सखोल चौकशी करून दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.

- दिगंबर भोगावडे, सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी आणि इतर खाद्य व्यावसायिकांनी अन्नसुरक्षेचे नियम पाळणे ही केवळ कायदेशीर नव्हे, तर नैतिक जबाबदारीही आहे. नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. प्रशासनाने नियमित तपासण्या वाढवून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. तसेच, नागरिकांनीही अस्वच्छता किंवा संशयास्पद प्रकार दिसल्यास तक्रार करून जागरूक नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडावी.

- अनिता काटे, नगरसेविका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news