रत्नागिरी

Ratnagiri news: गांगणवाडीचा मार्ग प्रकाशमान; ३० पथदीपांमुळे वाडी झळाळली

या उपक्रमामुळे संपूर्ण मार्ग रात्रीच्यावेळी प्रकाशमान झाला असून गांगणवाडी प्रकाशाच्या झगमगाटात न्हाऊन निघाली आहे

पुढारी वृत्तसेवा

राजापूर : सामाजिक बांधिलकीची परंपरा जपत मागील पाच दशकांहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रायपाटण मधील जागृत सेवा मंडळ, गांगणवाडी तसेच उत्कर्षदीप युवा मंडळाने आणखी एक लोकहिताचा उपक्रम राबवला आहे. गांगणवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर तब्बल ३० पथदीपांची उभारणी केली आहे. या उपक्रमामुळे संपूर्ण मार्ग रात्रीच्या वेळी प्रकाशमान झाला असून गांगणवाडी प्रकाशाच्या झगमगाटात न्हाऊन निघाली आहे.

रायपाटण गावातील गांगणवाडी ही अर्जुना नदीच्या पलीकडे वसलेली मोठी वस्ती आहे. या वाडीकडे जाणारा पक्का मार्ग असला तरी रात्रीच्या वेळी पुरेशा प्रकाशाअभावी नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत होता. ही गरज ओळखून जागृत सेवा मंडळ आणि उत्कर्षदीप युवा मंडळाने पुढाकार घेत मार्गावरील महत्त्वाच्या ठिकाणी ३० पथदीप बसविण्याचा निर्णय घेतला.

सर्व पथदीप कार्यान्वित झाल्याने अर्जुना नदीच्या पात्रापासून गांगणवाडीच्या अखेरच्या टोकापर्यंतचा संपूर्ण मार्ग उजळून निघाला आहे. यामुळे नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्यांची सुरक्षितता वाढली असून परिसराच्या सौंदर्यातही भर पडली आहे. या उपक्रमामुळे गांगणवाडीतील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून मंडळांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. सामाजिक कार्यासोबतच गावाच्या मूलभूत सुविधांच्या उभारणीतही पुढाकार घेण्याची परंपरा या उपक्रमातून पुन्हा अधोरेखित झाली आहे.

स्थानिकांच्या मते, पथदीपांमुळे केवळ अंधार दूर झाला नसून सुरक्षितता, सुविधा आणि विकासाचा नवा प्रकाश गांगणवाडीत पोहोचला आहे. गावाच्या प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या या संस्थांनी राबविलेला हा उपक्रम ग्रामीण भागातील लोकसहभागातून विकास साधण्याचा आदर्श ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT