

डोंबिवली : सततच्या अतिवृष्टीमुळे उल्हास नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे नदीचे पाणी मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात घुसले असून, खबरदारीचा उपाय म्हणून केंद्रातून होणारा पाणीपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नदीची पातळी सामान्य होईपर्यंत हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
यामुळे कल्याण पश्चिम विभागातील शहाड, भोईरवाडी, रामबाग, चिकणघर, घोलपनगर, मिलिंदनगर, योगीधाम, मुरबाड रोड, जोशी बाग, बिर्ला कॉलेज ते खडकपाडा चौक या परिसरातील पाणीपुरवठा बंद राहील. याशिवाय संपूर्ण अशोकनगर-वालधुनी आणि शिवाजीनगर-वालधुनी या भागातील नागरिकांनाही पाणीटंचाईचा फटका बसणार आहे. केडीएमसी प्रशासनाने या पार्श्वभूमीवर नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पावसामुळे आधीच नदीने धोक्याची पातळी ओलांडली असताना, आता पाणीपुरवठा बंद झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.
कल्याण पश्चिमेतील गांधारी पुलाला उल्हास नदीचे पाणी खेटल्याने या परिसरातील २०० हून अधिक रहिवाशांचे स्थलांतर करण्यात आले असल्याचे वृत्त आहे. मुसळधार पावसामुळे उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. गांधारी पुलाजवळ नदीपात्रातील पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना आणि सखल भागांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
धरण प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी दीड वाजता उल्हास नदीची पातळी १८.०० मीटर इतकी नोंदविली गेली. नदीसाठी निश्चित केलेली इशारा पातळी १६.५० मीटर आणि धोक्याची पातळी १७.५० मीटर आहे. सध्याची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा ०.५० मीटरने जास्त आहे. गेल्या २४ तासांत परिसरात जोरदार पाऊस झाला असून सकाळी ७ वाजेपर्यंत १३४ मिमी पावसाची नोंद झाली. या मान्सून हंगामात आतापर्यंत एकूण ५६७ मिमी पाऊस झाला आहे.
नदीची पातळी वाढल्याने कल्याणमधील गोपाळनगर, कोळीवाडा, गांधारी पूल परिसर आणि टिटवाळ्यातील सखल भागातील सुमारे ५० हून अधिक कुटुंबांतील २०० रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. महापालिका आणि महसूल प्रशासनाच्या पथकांनी शाळा तसेच समाजमंदिरांमध्ये तात्पुरत्या निवारा केंद्रांची व्यवस्था केली आहे. तेथे अन्न, पाणी आणि वैद्यकीय मदतीचे वाटप सुरू आहे. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
उल्हास नदीच्या वाढत्या पातळीमुळे कल्याण-टिटवाळा रस्त्यावरील शहाड पूल, गांधारी पूल आणि काही अंतर्गत रस्त्यांवर पाणी आले आहे. त्यामुळे या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. कल्याण ते टिटवाळा आणि बदलापूरकडे जाणाऱ्या एसटी बसेसच्या फेऱ्या इतर मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. नदीकाठच्या रेल्वे ट्रॅकवरही पाणी आल्यास लोकल सेवा विस्कळीत होऊ शकते, अशी शक्यता रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे.
गेल्या वर्षी याच काळात म्हणजेच ६ जुलै २०२५ रोजी उल्हास नदीची पातळी १५.२० मीटर इतकी होती, जी इशारा पातळीच्या खाली होती. तसेच गेल्या वर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत एकूण ३८९ मिमी पाऊस झाला होता. यंदा त्याच्या तुलनेत १७८ मिमीने अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळेच यंदा नदीने वेळेआधीच धोक्याची पातळी ओलांडली आहे.
पातळी झपाट्याने वाढत असल्याने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने बचाव पथके, बोटी आणि एनडीआरएफचे पथक तैनात केले असून परिस्थितीवर २४ तास लक्ष ठेवले जात आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांसाठीही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने नदीच्या पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. रहिवाशांनी अनावश्यकरीत्या नदीकाठच्या भागात जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सततच्या मुसळधार पावसामुळे कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर महामार्गावरील जुना रायता पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील नवीन रायता पूल वाहतुकीसाठी सुरू असल्याने मोठ्या वाहनांची वर्दळ सुरू आहे.
जुना पूल पाण्याखाली गेल्याने म्हारळ, वरप, कांबा या गावांमधील सखल भागात पाणी शिरले आहे. रस्त्यांवर आणि घरांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून शाळा, बाजारपेठा आणि दळणवळण ठप्प झाले आहे.
पाणी साचलेल्या भागातून रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मदतीला धावले होते. मात्र, शासनाने पूरग्रस्त भागासाठी दिलेल्या 'इमर्जन्सी किट' स्वीकारण्यास म्हारळ ग्रामपंचायतीने नकार दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे बचाव कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांसह रहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे उबाठाचे युवासेना शहर अधिकारी निकेत व्यवहारे यांनी सांगितले. ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, पुरामधल्या काळात मदत नाकारणे म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळ असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
स्थानिक प्रशासनाने संपूर्ण परिस्थितीवर करडी नजर ठेवली आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक बचाव पथके पूरग्रस्त भागात तैनात आहेत. नवीन पुलावरून वाहतूक सुरू असल्याने अत्यावश्यक सेवा आणि मदत साहित्याची ने-आण सुरळीतपणे सुरू आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासकीय सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.