कोकण

रत्नागिरी : अर्जुना प्रकल्पाचा उजवा कालवा फुटला

अविनाश सुतार

राजापूर : पुढारी वृत्तसेवा : गेले दोन दिवस सर्वत्र कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे राजापूर तालुक्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. अर्जुनासह अन्य नद्यांना महापूर आला आहे. पूर्व तालुक्यातील अर्जुना प्रकल्पाचा उजवा कालवा फुटल्याने बाजुच्या भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास दोन हेक्टर क्षेत्रातील शेती वाहून गेली आहे. तर अतिवृष्टीमुळे धोपेश्वर येथील खचणाऱ्या डोंगरामुळे १२० तर जवळेथर येथे जामदा नदीच्या पुरामुळे ९ अशा १२९ नागरिकांना अन्यत्र स्थलांतराच्या सुचना प्रशासनाने दिल्या आहेत. आणखी ९ जणांना स्थलांतराबाबतच्या नोटीसा देण्यात येणार आहेत.

राजापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत पडझडीच्या किरकोळ घटना घडल्या असल्या तरी सुदैवाने जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. पूर्व परिसरात झालेल्या अतिवृष्टीमध्ये अर्जुना प्रकल्पाचा उजवा कालवा फुटून पाचल कोंडवाडीतील भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यात गोविंद राजाराम पवार, विकास सदानंद पवार, गोपाळ सिताराम पवार या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सुमारे दोन हेक्टर जमिनीवरील लावणी झालेले भातशेती वाहून गेली आहे. तर कालव्यापासून सुमारे दोनशे मीटर अंतरावर असलेल्या वस्तीला धोका निर्माण झाला आहे.

शहरालगत असलेल्या धोपेश्वर गावात डोंगर खचत असल्याने त्या खाली असलेल्या मानवी वस्तीला धोका निर्माण झाला आहे. तेथील १२० नागरिक आणि २९ कुटुंबियांना सुरक्षित स्थलांतरीत करण्याच्या नोटीसा प्रशासनाने दिल्या आहेत. आणखी सात कुटुंबियांना स्थलांतराबाबतच्या नोटीसा दिल्या जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जामदा नदीची पूरस्थिती पाहून जवळेथर येथील ९ नागरिक आणि ४ कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत होण्याच्या नोटीसा प्रशासनाने दिल्या आहेत.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT