ENG vs IND : इंग्लंडचा विजय! भारतावर ७ गडी राखून मात | पुढारी

ENG vs IND : इंग्लंडचा विजय! भारतावर ७ गडी राखून मात

पुढारी ऑनलाईन डेस्क : 15 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचे भारताचे स्वप्न भंगले. बर्मिंगहॅम कसोटीत इंग्लंडने टीम इंडियाचा 7 विकेटने पराभव केला. फॉर्ममध्ये असलेल्या जो रूट (142) आणि जॉनी बेअरस्टो (114) यांच्यातील चौथ्या विकेटसाठी 269 धावांच्या भागीदारीमुळे इंग्लंडने 378 धावांचे लक्ष्य तीन गड्यांच्या मोबदल्यात पार केले. यासह पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी झाली आहे.

रूटच्या बॅटचा धमाका…

जो रूटने सामन्याच्या पाचव्या दिवशी कसोटी कारकिर्दीतील 28वे शतक झळकावले. 2021 नंतर या इंग्लंडच्या फलंदाजाने 47 डावात 11 शतके ठोकली आहेत. भारताविरुद्ध रूटचे 9वे शतक आहे.

भारतीय संघ दुसऱ्या डावात 245 धावांत सर्वबाद झाला आणि इंग्लंडला 378 धावांचे लक्ष्य मिळाले. लक्ष्य मोठे आहे असे वाटले, पण इंग्लंडच्या सलामीवीरांनी सामन्याच्या चौथ्या दिवशी उर्वरीत दोन सत्रांमध्ये भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. अॅलेक्स लीस आणि जॅक क्रॉलीने पहिल्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी केली. यानंतर 3 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले आणि भारतीय संघाने सामन्यात कमबॅक केले. पण हा आनंद काही क्षणा पुरताच राहिल आणि जॉनी बेअरस्टो आणि जो रूट यांनी धमाकेदार खेळी करून टीम इंडियावर वर्चस्व गाजवत संघाला विजय मिळवून दिला.

दरम्यान, जो रूटने शतक पूर्ण करून कसोटी शतके ठोकण्याच्या बाबतीत स्टीव्ह स्मिथ आणि विराट कोहली यांना मागे टाकले आहे. या सामन्यात रुटने आपल्या शानदार खेळीमुळे इंग्लंडला विजयाच्या उंबरठ्यावर नेले आहे. या मालिकेतील जो रूटचे हे चौथे शतक आहे. स्मिथ आणि विराटच्या नावावर 27 शतके आहेत, तर विल्यमसनच्या नावावर 24 शतके आहेत.

Back to top button