औरंगाबाद : डोळ्यांप्रमाणे पापणीदेखील नाजूक अवयव | पुढारी

औरंगाबाद : डोळ्यांप्रमाणे पापणीदेखील नाजूक अवयव

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : शरीराच्या नाजूक भागांमध्ये डोळ्यांप्रमाणेच पापण्यांचाही समावेश होतो. अ‍ॅलर्जीमुळे पापण्यांना खाज सुटणे, सूज येणे, जळजळ, गुठळ्या जाणवणे यांसारख्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे हानिकारक ठरू शकते. त्यामुळे डोळ्यांसोबतच पापण्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे नेत्र चिकित्सकांनी सांगितले.

औरंगाबादेत रविवारी आयोजित राष्ट्रीय ऑक्युलोप्लास्टी परिषेत देशभरातील 250 नेत्रचिकित्सकांनी सहभाग नोंदवला. यावेळी उपस्थित  ऑक्युलोप्लास्टी असोसिएशनऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. सुभाष बेथोरिया म्हणाले, की डोळ्यांच्या संरक्षणाचे काम पापणी करते. त्यामुळे पापण्यांची निगा राखणे अत्यावश्यक ठरते. पापण्यांमध्ये वारंवार खाज येणे हे डोळ्यांभोवती समस्या असल्याचे लक्षण आहे. एकटक मोबाईल किंवा टीव्ही पाहणे, डोळ्यांजवळचे काम करणे यांमुळे डोळे कोरडे पडतात, जडपणा येतो. याकडे दुर्लक्ष न करता नेत्रतज्ज्ञांचा सल्‍ला घ्यावा. पापण्यांच्या समस्या गंभीर बनल्यास त्यांचा दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. आधुनिक उपचारामुळे चष्मामुक्‍तीसोबतच पापणी बंद न होणे, न उघडणे या समस्या सोडविणे शक्य आहे, परंतु,  यासाठी वेळेत निदान व उपचार आवश्यक असल्याचे डॉ. बेथोरिया यांनी नमूद केले

उन्हामुळे पापण्यांचे आजार

मुंबई येथील नेत्र चिकित्सक डॉ. सावरी देसाई म्हणाल्या, की सतत उन्हात काम करणार्‍यांना पापण्यांचे आजार होण्याचे प्रमाण अधिक आहे. रांजणवाडीसारख्या लाल-पिवळ्या गाठी न जाणे, हे पापण्यांचे ट्यूमर असू शकते. वेळेत निदान व उपचारामुळे पापण्यांच्या समस्या,
आजारांपासून मुक्‍ती मिळू शकते.

Back to top button