कोकण

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर आडवलीजवळ दरड कोसळली

अविनाश सुतार

लांजा : पुढारी वृत्तसेवा : मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावर लांजा तालुक्यातील आडवली रेल्वे स्टेशन दरम्यान हसोळ गावाच्या हद्दीत शुक्रवारी (दि.७)) सकाळी ११ वाजता दरड कोसळली. दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक कोलमडली होती. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर दरड बाजूला करण्यात यश आले. दुपारी २ वाजता वाहतूक पूर्ववत झाली. गस्तीवरील ट्रकमॅनच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य अपघात टळला. सुमारे तीन तासांनी वाहतूक सुरळीत झाली.

कोकण रेल्वेच्या आडवली रेल्वे स्थानकादरम्यान हसोळ नजीक ही दरड कोसळण्याची घटना घडली. शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळल्याने मुंबई व मडगावच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या ३ तास उशिराने धावल्या. कोकणात सलग दोन दिवस परतीच्या पावसाने जोर धरला आहे. मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. दरड कोसळल्याने मुंबई आणि मडगावच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या रत्नागिरी, विलवडे, वेरवली, निवसर, वैभववाडी स्थानकांवर थांबवण्यात आल्या. सावंतवाडी – दिवा ही गाडी वेरवली स्थानकावर, राजधानी एक्सप्रेस निवसर स्थानकावर थांबवली. अन्य गाड्या रत्नागिरी, वैभववाडी येथे थांबविण्यात आल्या.

गुरुवारपासून सलग दोन दिवस लांजा तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. आडवली वेरवली दरम्यान आडवली स्थानकात गस्तीवर असलेल्या ट्रकमन अभय पाटोळे यांना रेल्वे रुळावर दरड आल्याचे लक्षात येताच प्रसंगावधान साधून तातडीने आडवली स्टेशन मास्तर आणि संबंधित अधिकारी यांना कळविले. यानंतर रेल्वे यंत्रणा त्वरित घटनास्थळी दाखल झाली. सावंतवाडी ते दिवा ही ट्रेन वेरवली येथून निघणार होती. परंतु, वेळीच ही गाडी रोखून धरण्यात आली. यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान या घटनेमुळे मडगाव हप्पा, मांडवी एक्सप्रेस डाऊन, जनशताब्दी, राजधानी या गाड्या विलंबाने धावत होत्या. रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नाने रेल्वे रुळावर आलेले मोठे दगड, दरड बाजूला करण्यात आली. दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान मार्ग सुरळीत झाला.

मोठा अनर्थ टळला

वेरवली आणि आडवली हे अंतर सात ते आठ किलोमीटरचे आहे. घटना घडल्याचे ठिकाण यापासून सावंतवाडी दिवा ही ट्रेन दहा किलोमीटर अंतरावर होती. मात्र, ट्रॅकमन अभय पाटोळे याच्या ही घटना लक्षात आल्यानंतर वेळीच ही गाडी वेरवली येथे रोखून धरण्यात आली. यामुळे मोठा अनर्थ टळला.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT