कोकण

दापोली शहरातील शिवपुतळा अनावरणावरून राजकारण

backup backup

दापोली ; पुढारी वृत्तसेवा : दापोली शहरात बांधण्यात आलेल्या शिवपुतळ्याचे अनावरण हे २९ मार्चला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे, अशी घोषणा दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी केली होती. तर पुतळा अनावरण कार्यक्रम हा नगर पंचायतीला डावलून आमदार करत असल्याचा आरोप नगर परिषदेतील सत्ताधाऱ्यांनी केला आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडीच्या नगरसेवकांनी शिवसेनेतील वरिष्ठ पदाधिकारी यांचेशी संपर्क करून २६ रोजी दापोली नगर पंचायत वर्धापनदिनी शिवपुतळ्याचे अनावरण आणि लोकार्पण करण्याची तारीख निश्चित केले आहे. या सोहळ्याला रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब, मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार असल्याची माहिती आघाडीच्या वतीने दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांनी दिली.

दि १७ रोजी दापोली नगर पंचायत सत्ताधारी नगरसेवकांनी दापोली येथील शिवपुतळ्याची पाहणी केली. यावेळी दापोलीचे माजी आमदार संजय कदम, शिवसेना तालुका प्रमुख ऋषीकेश गुजर, शहर प्रमुख संदीप चव्हाण, उपशहर प्रमुख विक्रांत गवळी प्रसिध्दी प्रमुख किशोर साळवी आदी उपस्थित होते.

  जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्याशी बोलूनच पुतळ्याच्या लोकार्पणाची २६ तारीख निश्चित करण्यात आली आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी यांना या लोकार्पण सोहळ्यासाठी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून निमंत्रित केले जाणार आहे. तर या तालुक्याचे आमदार व अन्य पदाधिकारी यांना देखील नगर पंचायतीच्यावतीने निमंत्रीत करण्यात येणार आहे, असे कदम यांनी सांगितले.

मंत्री आदित्य ठाकरे २९ रोजी शिवपुतळ्याचे अनावरण आणि लोकार्पण करण्यासाठी शहरात येणार आहेत, अशी माहिती आमदार योगेश कदम यांनी माध्यमांना दिली होती. मात्र नगर पंचायतीने २६ रोजी लोकार्पण करण्याची तारीख निश्चित केल्याने ना. आदित्य ठाकरे दापोलीत येणार नाहीत, असे नगर पंचायतीने निश्चित केलेल्या तारखे वरून दिसत आहे.

हेही वाचलं का?

SCROLL FOR NEXT