आव्हानात्मक काम मिळेल अशी प्रार्थना करा; पंतप्रधान मोदी यांचा प्रशासनिक सेवा विद्यार्थ्यांना संदेश | पुढारी

आव्हानात्मक काम मिळेल अशी प्रार्थना करा; पंतप्रधान मोदी यांचा प्रशासनिक सेवा विद्यार्थ्यांना संदेश

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
तुम्ही जेवढे सुरक्षित काम शोधाल, तितकेच स्वतःच्या आणि देशाच्या प्रगतीला अडवाल. त्यामुळे आव्हानात्मक काम मिळेल, अशी प्रार्थना करा, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मसुरीच्या लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन संस्थेतील प्रशासनिक सेवा विद्यार्थ्यांना दिला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.

फाईली आणि फिल्डच्या कामातला फरक समजून तुम्हाला काम करावे लागेल, असे सांगून मोदी पुढे म्हणाले की, फाईलीमध्ये तुम्हाला खरा आनंद मिळणार नाही. आनंदासाठी फिल्डवरच जावे लागेल. फाईलीमध्ये जे आकडे असतात, ते केवळ आकडे नसतात तर प्रत्येक आकडा, प्रत्येक क्रमांक एक जीवन असते. तुम्हाला एका नंबरसाठी नाही तर प्रत्येक जीवनासाठी काम करायचे आहे. कोणताही नियम बनविण्यात आला तो कशासाठी बनविण्यात आला, याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करा, असे आवाहनही त्‍यांनी केले.

मोदी यांनी 96 व्या संयुक्त फाउंडेशन कोर्सच्या विद्यार्थ्यांना तसेच 2021 च्या बॅचच्या प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. तुमची ही बॅच विशेष आहे, कारण देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी तुम्ही आपले काम सुरू करीत आहात. पुढील २५ वर्षात देशाचा जो विकास होईल, त्यात तुमची मोठी भूमिका असेल, असेही मोदी यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचलं का?

 

Back to top button