Nitesh Rane On Nilesh Rane:
शिवसेना शिंदे गटाचे निलेश राणे यांनी भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरावर छापा टाकून नगरपालिका निवडणुकीत भाजप पैशाचा वापर करत असल्याचा आरोप केला होता. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. निलेश राणे यांनी याबाबत फेसबूक लाईव्ह केलं होतं. दरम्यान, बेकायदेशीररित्या घरात घुसल्याप्रकरणी निलेश राणे यांच्याविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
निलेश राणेंविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली. मात्र भाजपचे आमदार आणि निलेश राणे यांचे बंधू नितेश राणे हे मात्र आपल्या भावाच्या बाजूने मैदानात उतरले. त्यांनी निलेश राणेंचा बळीचा बकरा केला जातोय असं वक्तव्य केलं. पत्रकार परिषदेवेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी त्यांनी कोकणातील राणेंचे अस्तित्व संपवण्याच्या प्रयत्न सुरू असल्याच्या प्रश्नावरून शिवसेना शिंदे गटाचे दीपक केसरकर यांच्यावर देखील निशाणा साधला.
निलेश राणेंच्या वादग्रस्त छाप्याच्या व्हिडिओवर बोलताना नितेश राणे म्हणाले, 'मी आजही सांगतो की आदरणीय निलेशजींचा बळीचा बकरा केला जातोय. त्यांना एकटं पाडलं जातंय. का दुसरा शिवसेनेचा नेता बोलत नाही. उदयजी येऊन का रवी चव्हाण साहेबांवरती टीका करत नाहीयेत. निलेशजींनाच का पुढे केलं जातं. अजूनपर्यंत निलेशजींच्या समर्थनार्थ एकही शिवसेनेचा नेता का पुढं आला नाही.
नितेश राणे पुढे म्हणाले, 'गुलाबराव पाटील तिकडं राज्यातील कुठल्यातरी नगरपालिकेमध्ये राणे साहेबांची कशी खिल्ली उडवतोय याचा व्हिडिओ दाखवू का... निलेशींच्या बाजूनं एक शिवसेनेचा नेता बोलत नाहीये. ना रत्नागिरीतला ना कोकणातला ना महाराष्ट्रातला. दीपक केसरकर साहेबांनी घ्यावं रविंद्र चव्हाणांचं नाव.
तोडग्याबाबत नितेश राणे म्हणाले, 'निलेशी बोलल्याप्रमाणे २ डिसेंबरनंतर फडणवीस चव्हाण साहेबांसोबत बसू अन् महायुती म्हणून यातून काय मार्ग निघतो हे आपण पाहू.'
नितेश राणे यांनी दीपक केसरकर यांच्या राणेंना कोकणातून संपवण्याच्या कट रचला जातोय या वक्तव्याचा देखील समाचार घेतला. त्यांनी २०१४ ला नारायण राणेंविरूद्ध कुणी शड्डू ठोकला असा सवाल करत ज्यांनी याची सुरूवात केली तेच आता हे बोलत आहेत याच्याकडं लक्ष वेधलं.