

Nilesh Rane speech Sindhudurg News
कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) :
सिंधुदुर्गवासियांनी आम्हाला भरभरुन प्रेम दिले आहे. काही लोक म्हणतील की, निलेश राणे आता दुसऱ्या पक्षात जाईल. पण मी आयुष्यात कधी कुठेही जाणार नाही. ज्या शिवसेना नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्या कपाळाला गुलाल लावला, त्यांचे उपकार मी कधी आयुष्यात विसरणार नाही. कशाला जाऊ मी दुसरीकडे? अरे मी घरी बसेन पण माझ्या शिंदे साहेबांना सोडणार नाही. आज जुन्या केसेस काढून काही लोकांकडून निलेश राणे आणि शिवसेना पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहेत. माझ्यावर कितीही टीका करा, पण मला पराभूत करण्यासाठी तुम्हाला २५ वर्ष लागतील. परंतु, तुम्हाला या जिल्ह्यात लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येऊ देणारच नाही, हे विरोधकांनी लक्षात ठेवावे, असे शिंदे शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथील आभार सभेत सांगून, विरोधकांना लक्ष्य केले.
विधानसभा निवडणुकीतील यशाबद्दल शिवसेना नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कुडाळ येथील नवीन एसटी डेपोच्या मैदानावर गुरूवारी रात्री आभार सभा झाली. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री तथा शिवसेनेचे संपर्कमंत्री उदय सामंत, संपर्कप्रमुख रविंद्र फाटक, उपनेते संजय आंग्रे, शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे, जिल्हा प्रमुख दत्ता सामंत व संजू परब, संजय पडते, वर्षा कुडाळकर आदींसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आ. निलेश राणे म्हणाले, सभेला उशीर झाला आहे, याची मला जाणीव आहे. विधानसभा निवडणुकीतील यशानंतर राज्यभरात शिवसेना नेते उपमुख्यमंत्री शिंदे यांचा आभार दौरा सुरू आहे. आज सिंधुदुर्गात कुडाळ येथे त्यांची आभार सभा होत आहे. परंतु, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्याची दुर्देवी घटना घडली. तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटक, नागरिकांची विचारपूस तसेच मदत करण्यासाठी शिंदे जम्मू-काश्मीरला गेले होते. काल रात्रीपासून ते तिकडे आहेत. त्यामुळे त्यांना या सभेला येण्यास उशिर झाला याची मला जाणीव आहे. पण या कार्यक्रमावर काही लोक टीका करतील. काही पत्रकार पण असतील. आपण, ऑक्टोबर २०२४ मध्ये शिवसेनेत आलो आहे. तेव्हापासून मी आणि दत्ता सामंत आम्ही शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी मेहनत घेतोय. गावागावात शिवसेना वाढविण्याचे आमचे प्रयत्न आहेत.
आम्ही सुरूवातीपासून लढतच राहीलो आहोत. पाच महिने आम्ही इथे मेहनत घेतली, जे काय कष्ट घेतले, पक्ष उभा केला. गावागावामध्ये अन्य सगळे पक्ष बिथरले आहेत, असा शिवसेना पक्ष आम्ही उभा केला. आज टीका चारही बाजूंनी होते. कुठल्यातरी जुन्या केसेस काढल्या जात आहेत. काही पत्रकार आहेत ते पण याला खतपाणी घालत आहेत. जुन्या केसेस काढताना कसातरी निलेश राणे बदनाम झाला पाहिजे, कशी तरी शिवसेना बदनाम झाली पाहिजे. पण किती जरी बदनाम केलात तरी मी सामान्य कार्यकर्ता तुम्हाला आज या व्यासपीठावरून विश्वास देतो. विरोधक माझ्यावर टीका करतात. पण त्यांना मला इकडे परत पराभूत करण्यासाठी २५ वर्ष वाट बघावी लागेल. तुम्हाला मी लोकप्रतिनिधी व्हायला देणार नाही. या जिल्ह्यातून तरी आता लोकप्रतिनिधी होणार नाहीत. कुठून तरी आयात करून काय जर आणलं तर मला माहित नाही. पण या जिल्ह्यातून निवडून याल, अशी परिस्थिती ठेवणार नाही एवढे विरोधकांनी लक्षात ठेवावं, असा इशारा आमदार राणे यांनी विरोधकांना दिला.
आ. राणे म्हणाले, आम्ही लोकांसाठी खस्ता खाल्लेल्या आहेत. कोणी सांगितलं स्वभाव बदल, तेही केलं. कशासाठी तर माझ्या सिंधुदुर्गासाठी. या सिंधुदुर्गाने आमच्या राणे कुटुंबाला चांगले दिवस दाखवले. करायचं तर त्यांच्यासाठी करायचं आणि शेवटपर्यंत सिंधुदुर्गासाठीच करणार आहे. या निलेश राणेला दहा वर्षाच्या वनवासानंतर जर कोणी जिवंत केलं असेल तर ते माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने केले. आणि मग काही लोक म्हणतात निलेश राणे आता दुसऱ्या पक्षात जाणार. पण मी आयुष्यात कधी कुठेही जाणार नाही. ज्या शिंदे साहेबांनी या कपाळाला गुलाल लावला, त्यांचे उपकार मी कधी आयुष्यात विसरणार नाही. कशाला जाऊ मी दुसरीकडे? अरे घरी बसेन पण माझ्या शिंदे साहेबांना सोडणार नाही. मला विधानसभेचे तिकिट दिले आणि जिंकूनही आणले, ही किमया शिंदे यांनी केली, असे आ. राणे म्हणाले. मी सरकारमध्ये कोणाला फोन करीत नाही. मी फक्त मंत्री उदय सामंत यांना मदतीसाठी फोन करतो. बाकी कुठेही जात नाही. त्यामुळे उदय सामंत यांनी असेच प्रेम सिंधुदुर्गवर ठेवावे. तुमच्याकडे एमआयडीसी विभाग आहे. त्यामुळे आज येथे मोठी घोषणा करावी, अशी मागणी आ. राणे यांनी मंत्री सामंत यांच्याकडे केली. जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पक्षासाठी रक्ताचे पाणी केले.
या कार्यक्रमात त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांचे योगदान फुकट जायला नको, त्यांच्या कामाची दखल, मंत्री सामंत यांनी शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवावी. आज अनेकांचे वांदे झालेत की, निलेश राणे आणि दत्ता सामंत एकत्रित गावागावात घुसताहेत. पण शिवसेना वाढविण्यासाठी आम्ही सर्व काबिज करणार आहोत. उपमुख्यमंत्री शिंदे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि माझ्या मतदारसंघात स्वागत करतो, असे आ. राणे म्हणाले.