

Raj Thackeray Nashik Tree Cutting:
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी नाशिकमधील तपोवन इथली झाडं तोडून तिथं साधू ग्राम निर्माण करायला विरोध दर्शवला आहे. कुंभ मेळ्यासाठी साधू ग्राम उभारण्यासाठी नाशिक प्रशासन हे तपोवन इथली जवळपास १८०० झाडं तोडणार आहे. याला नाशिकमधील नागरिकांनी आणि समाजिक कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे. आता राज ठाकरे यांनी देखील ट्विट करून विरोध केला.
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नाशिक महापालिकेवर मनसेची सत्ता असतानाही कुंभ मेळा झाला होता. त्यावेळी आम्हाला कुठलंही झाड तोडण्याची गरज लागली नाही. आता या कुंभमेळ्यासाठी झाडं का तोडावी लागत आहेत असा प्रश्न देखील उपस्थित केला.
आगामी कुंभमेळ्यासाठी सरकारने १८०० झाडं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमध्ये कुंभमेळा हा काही पहिल्यांदा होत नाहीये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महापालिकेच्या सत्ताकाळात पण कुंभमेळा झाला. त्यावेळेला आम्ही भरपूर पायाभूत सुविधा उभारल्या. त्यावेळच्या नगरसेवकांचा आणि प्रशासनाचा उत्तम संवाद होता, त्यामुळे कामं करताना जनतेला काय हवं आहे याचा विचार केला गेला. एकूणच नियोजन इतकं उत्कृष्ट होतं की तेव्हाच्या महापौरांचा,नगरसेवकांचे प्रतिनिधी म्हणून आणि तत्कालीन आयुक्तांचा, प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून, थेट अमेरिकेत सत्कार झाला होता. आम्हाला या पायाभूत सुविधा उभ्या करताना कुठली झाडं तोडावी लागली नाहीत. मग आत्ता या कुंभमेळ्यासाठी झाडं का तोडावी लागत आहेत ? बरं ही झाडं तोडून त्याची भरपाई म्हणून दुसरीकडे झाडं लावली जातील, असली पोकळ आश्वासनं सरकारने देऊच नयेत कारण असं कधी होत नाही. आणि सरकारकडे जर दुसरीकडे पाचपट झाडं लावायला जागा आहे तर मग तिकडेच साधुग्राम करा. सरकारने साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात काहीतरी टाकण्याचा संधिसाधूपणा करू नये. आणि काही कोटी झाडं लावल्याची घोषणा भाजप सरकारने काही वर्षांपूर्वी केली होती, जी झाडं कुठे दिसली नाहीत. असो. आज कुंभमेळ्याचं कारण दाखवून झाडं तोडायची, साधूंच्या नावाने ती जमीन सपाट करून घ्यायची आणि मग नंतर पुढे ती आपल्या लाडक्या उद्योगपतीला दान करायची ! इतकाच विचार या सरकारचा असणार ! नाहीतरी सध्या महाराष्ट्रात दुसरं काय सुरू आहे ? जमिनी गिळणं नाहीतर उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करणं हेच सध्या सत्ताधारी मंत्री, आमदार , त्यांचे नातेवाईक आणि त्यांची वर्तुळं करताना दिसतायत ! नाशिककरांचा या वृक्षतोडीला तीव्र विरोध आहे. नाशिकरांना माझं आवाहन आहे की तुम्ही ठाम रहा, तुमच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहील. यामध्ये खरतर कोणतेच राजकारण नाही , या आत्ता होणाऱ्या निवडणुकांनंतर देखील आमचा या वृक्षतोडीला विरोधच राहील ! माझं सरकारला आवाहन आहे की उगाच संघर्ष वाढवू नका. लोकांचं काय म्हणणं आहे त्याचा कधीतरी आदर राखला जाईल असं पहा. तरीपण सरकारने संघर्षाची भूमिका घेतली तर जनतेच्या बरोबर या लढ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहेच आणि असेलच !
राज ठाकरे
नाशिकमधील कुंभ मेळ्यासाठी वृक्षतोडीच्या निर्णयाचा फक्त नाशिकमधूनच नाही तर राज्यभरातून विरोध होत आहे. पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते निरंजन टकले यांनी देखील वृक्षतोडीविरूद्ध मोहीम उघडली आहे. त्याचबरोबर अभिनेते आणि सह्याद्री देवराई चालवणारे सयाजी शिंदे यांनी देखील एकही झाड तोडू देणार नाही अशी भूमिका घेतली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील काल पत्रकार परिषदेत नाशिकमधील वृक्षतोडीला विरोध असल्याचं आणि तिथं सुरू असलेल्या नागरिकांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा असल्याचं सांगितलं होतं.