

मालवण : मालवणचा विकास पर्यटनातून साधणार असून, येथील प्रत्येक नागरिकाचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार होणे आवश्यक आहे. राज्य व केंद्रात भाजपची सत्ता असल्यामुळे मालवणच्या विकासाला आता ब्रेक नाही. विकास हाच भाजपा संस्कार आणि अजेंडा आहे, असे पालकमंत्री नितेश राणे यांनी जाहीर केले.
मालवण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टोपीवाला हायस्कूलच्या पटांगणात भाजपची ताकद दाखविणारी प्रचारसभा पार पडली. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमुळे सभेला अधिक ऊर्जितावस्था प्राप्त झाली. मंचावर मंत्री, जिल्हा पदाधिकारी, माजी आमदार आणि उमेदवारांची दणकट फळी तैनात होती. नितेश राणे यांनी भाषणात विरोधकांवर निशाणा साधत म्हटले, निवडणुकीत उगाच गोंधळ करून जनतेला दिशाभूल करणार्यांना जनता ओळखते. निवडणूक ही विकासाकडे नेणारी वाट आहे; आरोप-प्रत्यारोपांत अडकू नका. मालवणचा पर्यटन विकास देशभरात आदर्श ठरवू ही जबाबदारी आम्ही स्वीकारतो, असे सांगितले. माझ्यावर संभ्रम निर्माण करण्याचा डाव; पण मी मागे हटणार नाही शिल्पा खोत सभेत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शिल्पा खोत यांनी भावनिक सूर लावत विरोधकांवर जोरदार टोला लगावला.
‘काही दिवसांपूर्वी मी चांगली, कर्तृत्ववान उमेदवार म्हणून सर्वांच्या लक्षात होते, पण विरोधकांनी माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. जनतेत संभ्रम पसरवला; पण माझा हेतू स्वच्छ आहे. मालवणच्या विकासासाठीच मी राजकारणात उतरले आहे, असे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांनी सांगत विकासाची कामे करण्यासाठी तुमचा विश्वास हवा. मला संधी द्या मालवण बदलून दाखवू, असे आवाहन केले. या सभेत नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार आणि भाजप पदाधिकार्यांनी एकमुखाने पक्षाच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.