बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चिपी विमानतळाचे आज लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विमानतळाचे लोकार्पण करण्यात आले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री उदय सामंत, खा. विनायक राऊत, आ. दीपक केसरकर, आ. वैभव नाईक, आ. नितेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे आदी मान्यवर लोकार्पणवेळी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विमानतळासाठी अनेकांचे योगदान असल्याचे सांगितले. कोणतीही गोष्ट एकट्याने होत नसते तर सामूहिकरित्या पार पाडायची असते. चिपी विमानतळासाठी मोठी जागा असून विकासाच्या चांगल्या संकल्पना राबवू, असे ते म्हणाले. नाईट लँडिंगबाबत ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा झाल्याचेही ते म्हणाले.
विमानतळाच्या श्रेयवादावरून सुरू झालेल्या श्रेयवादावरून भाष्य करताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी चिपी विमानतळासाठी सर्वांचे योगदान असल्याचे नमूद केले. त्या सर्वांचे कौतुक करण्याचा हा क्षण असल्याचे ते म्हणाले. कोकणचा विकास कऱण्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.
आज सकाळी सिंधुदुर्ग विमानतळावर अलायन्स एअरच्या 70 सीटच्या पहिल्या विमानातून निमंत्रित मंडळी दाखल झाली. येत्या रविवारपासून प्रवासी वाहतूक सेवा सुरू होणार आहे.
सिंधुदुर्ग विमानतळावरून विमान सेवेबरोबरच आठवड्यातून तीनवेळा सिंधुदुर्ग ते शिर्डी अशी विमान सेवा सुरू करण्यासंदर्भात आमचे प्रयत्न सुरू आहेत. एअरलाईन्स कंपनीशी चर्चा झाली आहे. याबाबतही लवकर चाचपणी करुन सिंधुदुर्ग ते शिर्डी अशी विमानसेवा सुरू करण्याचा आमचा मनोदय असल्याचे खा. विनायक राऊत यांनी म्हटले आहे.
हे ही वाचलं का?