Chipi Airport : नारायण राणे आणि उद्धव ठाकरे चार वर्षांनी एकत्र येणार, पण व्यासपीठावर….. | पुढारी

Chipi Airport : नारायण राणे आणि उद्धव ठाकरे चार वर्षांनी एकत्र येणार, पण व्यासपीठावर.....

सिंधुदुर्ग; पुढारी ऑनलाईन

चिपी-परुळे येथील सिंधुदुर्ग विमानतळाचा Chipi Airport लोकार्पण सोहळा आज शनिवारी दुपारी 1 वाजता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या सोहळ्यात केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे मुंबईहून दूरद‍ृश्य प्रणालीद्वारे सहभागी होणार आहेत.

केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री उदय सामंत, खा. विनायक राऊत, आ. दीपक केसरकर, आ. वैभव नाईक, आ. नितेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आयआरबी, एमआयडीसी विभागाने उद्घाटनाची जय्यत तयारी केली आहे.

उद्घाटनाच्या पार्श्‍वभूमीवर सिंधुदुर्ग विमानतळ Chipi Airport व परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. हा उद्घाटन सोहळा पाहण्यासाठी सिंधुदुर्गवासीयांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

सिंधुदुर्ग विमानतळ प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे तब्बल चार वर्षानंतर एकाच व्यासपीठावर येत आहेत. मात्र, व्यासपीठावरील दोघांच्या खुर्चीमधील अंतर वाढवण्यात आलं आहे. हे अंतर दीड फुटांवरून अडीच फुट करण्यात आले आहे.

Chipi Airport : नारायण राणेंकडून तलवार म्यान

आपण मुख्यमंत्र्यांच्या समोरच या विमानतळाला ज्यांनी विरोध केला त्यांची नावे जाहीर करणार आहोत असा इशारा नारायण राणे यांनी दिला होता. त्यामुळे ते काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र, त्यांनी कोणतेही राजकारण करणार नाही, असे सांगत आपली तलवार म्यान केली आहे. कार्यक्रमाला कोणत्याही प्रकारचे गालबोठ लागेल असे कृत्य आमच्याकडून होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांसोबत एकाच व्यासपीठावर येणार असल्याने याबाबत त्यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले की, चांगली गोष्ट आहे. बऱ्याच वर्षांनी हा योग आला आहे. पुन्हा असा प्रसंग येणार का असे विचारले असता त्यांनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला.

हे ही वाचलं का?

Back to top button