Alphonso Mango GI Tag Konkan Vs Gujarat Controvresy
जगाला वेड लावणाऱ्या कोकणच्या हापूस (आल्फान्सो) आंब्यावर आता गुजरातने दावा केल्याने महाराष्ट्रातील आंबा उत्पादकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. वलसाड हापूस या नावाने भौगोलिक मानांकन (Geographical Indication - GI) मिळवण्यासाठी गुजरातने अर्ज दाखल केला आहे. हापूस आंब्याला मिळालेले 'कोकण हापूस' हे जगातले पहिले आणि एकमेव जीआय मानांकन धोक्यात येण्याची शक्यता असल्याने कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे.
वलसाडची मागणी: वलसाड हापूस नावाने जीआय मानांकन मिळवण्यासाठी गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाने अर्ज दाखल केला आहे.
पहिली सुनावणी: कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर 30 ऑक्टोबर रोजी या अर्जावर पहिली सुनावणी झाली.
कोकणचा विरोध: या अर्जाला कोकण आंबा उत्पादक आणि विक्रेता संघटनेने तीव्र विरोध दर्शवला आहे. वलसाड हापूसला मानांकन मिळाल्यास कोकणातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कोकण हापूसला 2008 साली जीआय मानांकन मिळाले. येथील भौगोलिक परिस्थिती, माती आणि विशिष्ट चव (इसेन्स) यावर आधारित सर्व कागदपत्रे 2018 पर्यंत सादर करण्यात आली होती.
कोकण आंबा उत्पादक संघटनेच्या म्हणण्यानुसार, वलसाडमधील आंब्याला त्यांच्या परिसराचे मानांकन मिळू शकते, पण त्याला 'हापूस'चे मानांकन मिळू नये. ज्याप्रमाणे 'मिगीला' आंबा आहे, त्याप्रमाणे त्यांनी आपल्या आंब्याला 'वलसाड आंबा' म्हणून विकावे.
हापूस आंब्याच्या या वादावर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अतुल भातखळकर (भाजप): "देवगड हापूस किंवा रत्नागिरी हापूसची चव बाजूला होईल असे वाटत नाही. आमची मधुर चव तशीच राहणार आहे. वलसाड किंवा कर्नाटकचा आंबा आला तरी रत्नागिरी हापूसला किंवा देवगड हापूसला कोणीही बाजूला करू शकत नाही."
संजय राऊत (शिवसेना - उबाठा): "संपूर्ण जगाला माहीत आहे की हापूस आंबा हा कोकणचा राजा आहे. दुबईतून आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रातून व्यापारी लोक कोकणचा हापूस घेऊन जाण्यासाठी येतात. कोकणच्या हापूस आंब्याची जागा कोणी घेईल असे मला वाटत नाही."
वलसाड हापूसला जीआय मानांकन मिळवण्यासाठी याचिका दाखल करणारे डॉक्टर विवेक भिडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. या प्रकरणाला आता कोकणवासीयांकडून जोरदार विरोध होत असून, ते आपल्या हक्काच्या आंब्यासाठी लढण्यास सज्ज झाले आहेत.