

New Zealand Vs West Indies:
न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना हा ख्राईस्टचर्चच्या हेगले ओवलवर खेळला गेला. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत रंजक झाला. या सामन्याचा निकाल हा अनिर्णत असा लागला. मात्र वेस्ट इंडीजनं चौथ्या डावात केलेल्या कामगिरीची जागतिक स्तरावर चर्चा सुरू आहे.
यजमान न्यूझीलंडने वेस्ट इंडीजसमोर विजयासाठी ५३१ धावांचे आव्हान ठेवले होते. हे टार्गेट पाहूनच अनेकांना धडकी बसेल. हे अशक्यप्राय टार्गेट वेस्ट इंडीज काही पूर्ण करू शकणार नाही. न्यूझीलंड सहज सामना जिंकेल असं वाटलं होत. मात्र झुंजार वेस्ट इंडीजनं चौथ्या डावात दमदार फलंदाजी केली. त्यामुळं हा सामना वेस्ट इंडीजच्या चाहत्यांना आयुष्यभर लक्षात राहील.
शनिवारी ६ डिसेंबर रोजी पहिल्या सामन्याचा पाचवा दिवस होता. या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी वेस्ट इंडीजनं १६३.३ षटकात ६ विकेट्स गमावून ४५७ धावा केल्या होत्या. वेस्ट इंडीज सामना जिंकण्याच्या फक्त ७४ धावा मागे होते. जर या ७४ धावा केल्या असत्या तर वेस्ट इंडीजनं ऐतिहासिक विजय मिळवला असता.
आतापर्यंत कसोटी इतिहासात चौथ्या डावात ५०० पेक्षा जास्त धावा करून कोणीही सामना जिंकलेला नाही. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठा चेस करण्याचा विक्रम वेस्ट इंडीजच्या नावावरच आहे. वेस्ट इंडीजनं २००३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध एटिग्वा कसोटीत ४१८ धावांचे टार्गेट चेस केले होते.
वेस्ट इंडीजच्या दुसऱ्या डावाचा हिरो जस्टिन ग्रीव्स ठरला. त्यानं दमदार फलंदाजी करत ३८८ चेंडूत नाबाद २०२ धावांची द्विशकी खेळी केली. यात १९ चौकारांचा समावेश आहे. तर वेगवान गोलंदाज केमार रोचने देखील झुंजार फलंदाजी करत २३३ चेंडूंचा सामना केला. त्याने नाबाद ५८ धावा केल्या. त्यात ८ चौकारांचा समावेश होता.
ग्रीव्स आणि रोच यांनी सातव्या विकेटसाठी १८० धावांची नाबाद भागीदारी रचली. यापूर्वी ग्रीव्सने शाय होप सोबत पाचव्या विकेटसाठी १९६ धावांची भागीदारी रचली होती. होपने १५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीनं २३४ चेंडूत १४० धावांचे योगदान दिले.
न्यूझीलंचला चौथ्या डावात वेगवान गोलंदाज मॅट हेन्री आणि नॅथन स्मिथ यांची उणीव भासली. हेन्री दुखापतीमुळं फक्त ११ षटके टाकू शकला. तर स्मिथ दुखापतमीमुळे उपलब्धच नव्हता. याचबरोबर वेस्ट इंडीजच्या फलंदाजांना अनेक जीवनदान देखील मिळाले. मात्र वेस्ट इंडीजच्या फलंदाजांनी दाखवलेला झुंजारपणा वाखाण्याजोगा होता.
न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २३१ धावा केल्या होत्या. तर वेस्ट इंडीजनं पहिल्या डावात १६७ धावा केल्या. त्यानंतर न्यूझीलंडने दुसऱ्या डावात ८ बाद ४६६ धावा करत आपला डाव घोषित केला. यात रचिन रविंद्रने १७६ धावांचे योगदान होते. तर टॉम लॅथमने १४५ धावा ठोकल्या.