NCP Sharad Pawar Municipal Election Defeat Reasons: काल महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाला मोठा धक्का बसला आहे. अनेक वर्षे राज्याच्या राजकारणात ‘किंगमेकर’ची भूमिका बजावणाऱ्या या पक्षाला यंदा 18 महानगरपालिकांमध्ये अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही. काही ठिकाणी तुटपुंज्या जागा मिळाल्या, तर अनेक शहरांमध्ये तर खातंही उघडता आलं नाही.
मुंबई – 1
ठाणे – 12
कल्याण–डोंबिवली – 1
भिवंडी–निजामपूर – 12
पुणे – 3
सांगली–मिरज–कुपवाड – 3
छत्रपती संभाजीनगर – 1
अकोला – 3
एकूण : 36 जागा
नवी मुंबई
उल्हासनगर
मिरा–भाईंदर
वसई–विरार
पनवेल
नाशिक
मालेगाव
धुळे
जळगाव
पिंपरी–चिंचवड
कोल्हापूर
नांदेड–वाघाळा
परभणी
अमरावती
नागपूर
चंद्रपूर
जालना
इचलकरंजी
राज्यात अनेक वर्ष सत्तेत असलेल्या पक्षाला महानगरपालिका निवडणुकीत फटका का बसला? या पराभवामागे काही ठोस कारणं आहेत. ती आपण पाहूयात.
या निवडणुकीत सर्वात मोठा तोटा झाला तो राष्ट्रवादीच्या फुटीमुळे. अनेक प्रभागांत शरद पवार गट आणि अजित पवार गटाचे उमेदवार एकमेकांविरुद्ध उभे राहिले. परिणामी, राष्ट्रवादीची पारंपरिक मतं दोन भागांत विभागली गेली. जेव्हा एकाच विचारधारेची मतं विभागली जातात, तेव्हा तिसऱ्या पक्षाला याचा फायदा होतो. अनेक ठिकाणी हेच घडलं. या 'व्होट कटिंग'मुळे राष्ट्रवादीची ताकद जिथे निर्णायक ठरू शकली असती, तिथे कमी झाली.
महानगरपालिका निवडणुकीत शहरातील मतदाराची अपेक्षा वेगळी असते. त्याला रस्ते, पाणी, वाहतूक, ड्रेनेज, कचरा, पार्किंग, अतिक्रमण या गोष्टींची उत्तरं हवी असतात. पण शरद पवार गटाकडून अनेक शहरांमध्ये प्रचार झालाच नाही. त्यामुळे मतदार नाराज झाला. हीच गोष्ट राष्ट्रवादीला अनेक शहरांत महागात पडली.
निवडणुकीत मतदाराला पक्षातली एकजूट दिसली नाही की तो लगेच दूर जातो. शरद पवार गटात अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर गटबाजी, नाराजी, तिकीटावरून मतभेद उघडपणे दिसले. काही ठिकाणी इच्छुकांनी बंडखोरी केली. काही ठिकाणी “त्याला तिकीट का दिलं?” हा राग प्रचारात दिसला. यामुळे पक्षाचा मेसेज मतदारापर्यंत पोहोचण्याऐवजी पक्षातील भांडणंच चर्चेत राहिली.
स्थानिक निवडणुका जिंकण्यासाठी तळागाळातला नेता महत्त्वाचा असतो. पण शरद पवार गटात अनेक ठिकाणी तिकीट वाटपापासून रणनीतीपर्यंतचे निर्णय काही लोकांपुरते मर्यादित राहिल्याची चर्चा झाली. परिणामी, स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह कमी झाला.
शहरांत लोकांना रोज भिडणारे प्रश्न हेच निर्णायक ठरतात. पण पाणीटंचाई, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन, अनधिकृत बांधकाम यावर शरद पवार गटाकडून ठोस, स्पष्ट आणि परिणामकारक रोडमॅप अनेक ठिकाणी दिसला नाही.
बूथवर कार्यकर्ता मजबूत असेल, तर मतदार घरातून बाहेर पडतो आणि मतदान केंद्रापर्यंत जाऊन तो पक्षाला मत देतो. परंतु शरद पवार गटाची बूथ पातळीवरील यंत्रणा अनेक शहरांत मजबूत दिसली नाही. काही ठिकाणी कार्यकर्ते कमी होते, तर काही ठिकाणी संघटनच विस्कळीत होतं. याचा परिणाम थेट मतदानाच्या आकड्यावर झाला.
अनेक ठिकाणी पदाधिकारी आणि स्थानिक नेतृत्वाकडून अपेक्षित हालचाल झाली नाही, असं बोललं जात आहे. निवडणुकीच्या काळातही काही पदाधिकारी निष्क्रिय राहिले. काहींनी तर 'सॉफ्ट कॉर्नर' ठेवत दुसऱ्या बाजूला मदत केल्याचीही चर्चा झाली. यामुळे मैदानात कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाला आणि प्रचाराची धार कमी झाली.
हा निकाल शरद पवार गटासाठी इशारा आहे. शहरांमध्ये पुन्हा उभं राहायचं असेल तर फक्त परंपरागत मतांवर नाही, तर मजबूत संघटन, स्थानिक मुद्दे आणि शहरकेंद्री नेतृत्व यावर काम करावं लागेल.