Digital 7 12 maharashtra legal status online download 15 rupees:
राज्यातील महसूल विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. डिजिटल सातबाऱ्याला आता अधिकृत कायदेशीर मान्यता मिळाली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची माहिती दिली. अनेक वर्षांपासून नागरिकांसाठी डोकेदुखी ठरलेल्या 7/12 उताऱ्याच्या प्रक्रियेत हा बदल क्रांतिकारी मानला जात आहे. नव्या परिपत्रकानंतर 7/12 मिळवण्यासाठी तलाठी कार्यालयाचे उंबरे झिजवण्याची गरज उरणार नाही.
डिजिटल स्वरूपातील सातबारा आणि 8A उतारे आता सरकारी, निमशासकीय, बँक, न्यायालयीन अशा सर्व कामांसाठी वैध मानले जातील. विशेष बाब म्हणजे नागरिकांना फक्त 15 रुपये भरून डिजिटल स्वाक्षरीत 7/12 उपलब्ध होणार आहे. तलाठ्याची स्वाक्षरी किंवा शिक्क्याच्या औपचारिकतेची गरज उरणार नाही.
इतिहासात पहिल्यांदाच राज्य सरकारने तलाठ्याच्या स्वाक्षरीला आवश्यकतेच्या यादीतून काढले आहे. गावकऱ्यांना सातबारा मिळवण्यासाठी वारंवार कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागत, काही भागांत पैसे दिल्याशिवाय उतारा हातात पडत नसे. सरकारच्या नव्या आदेशाने ही संपूर्ण साखळीच मोडून काढली असून सर्वसामान्यांना थेट डिजिटल सातबारा मिळणार आहे.
महाभूमी पोर्टलच्या digitalsatbara.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर नागरिकांना आता डिजिटल पेमेंटद्वारे सातबारा डाउनलोड करता येईल. प्रत्येक उताऱ्यावर डिजिटल स्वाक्षरी, क्यूआर कोड आणि 16 अंकी पडताळणी क्रमांक असेल, ज्यामुळे त्याची सत्यता कुणीही तपासू शकतो.
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 आणि संबंधित नियमांनुसार जारी करण्यात आलेल्या या नव्या परिपत्रकामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे पारदर्शकता वाढेल, नागरिकांचा वेळ वाचेल आणि महसूल विभागातील अनावश्यक दलाली थांबेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.