Ajit Pawar NCP Crisis: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसभोवती मोठ्या घडामोडी घडत असल्याची चर्चा आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत असून, तब्बल 22 आमदारांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांची गुप्त भेट घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
या भेटींमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे, या आमदारांच्या भेटीनंतरच पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनीही शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत अंतर्गत अस्वस्थता वाढल्याच्या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार गटातील काही आमदार सध्या राजकीय भविष्याबाबत साशंक आहेत. पक्षातील नेतृत्व, आगामी निवडणुकांची रणनीती आणि स्थानिक पातळीवरील समीकरणे यावरून नाराजीचा सूर असल्याचं बोललं जात आहे.
याच पार्श्वभूमीवर काही आमदारांनी थेट शरद पवारांशी संवाद साधल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, या भेटींमध्ये नेमकी काय चर्चा झाली किंवा कोणते आमदार सहभागी होते, याबाबत अधिकृत माहिती अद्याप मिळाली नाही.
राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या शरद पवार भेटीची आहे. सूत्रांच्या मते, आमदारांच्या हालचाली आणि पक्षातील वाढती अस्वस्थता लक्षात घेऊनच ही भेट झाल्याचं बोललं जात आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील अनेक आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा नव्या समीकरणांची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर या हालचाली महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.
या संपूर्ण प्रकरणावर अजित पवार गट किंवा शरद पवार गटाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे सूत्रांच्या दाव्यांमुळे सुरू झालेल्या चर्चांकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.