नान्नज : पुढारी वृत्तसेवा
जामखेड तालुक्यातील धोंडपारगाव परिसरात रविवारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारास झालेल्या अवकाळी पाऊस व वादळामुळे राजेश रामचंद्र जाधव या शेतकर्याची एक एकराची केळीची बाग पूर्णपणे भुईसपाट झाली. त्यात शेतकर्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्यात यावे, अशी मागणी राजेश जाधव यांच्यासह परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.
धोंडपारगाव येथील राजेश जाधव यांनी दोन एकरामध्ये केळीची लागवड वर्षभरापूर्वी केली होती. रविवारी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळामुळे एक एकरमधील दीडशे ते दोनशे केळीची झाडे घडासह जमिनदोस्त झाली.
त्यामुळे हाता-तोंडाशी आलेला शेतकर्याचा घास हिरावला आहे. वादळामुळे राजेश जाधव यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेचा त्वरित पंचनामा करून या शेतकर्याला मदत करण्यात यावी, अशी मागणी राजेश जाधव यांच्यासह परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.
हेही वाचा