तीस मजली इमारतीवरून उतरला खाली! | पुढारी

तीस मजली इमारतीवरून उतरला खाली!

बीजिंग ः एखाद्या स्पायडरमॅनसारखे उंच इमारतीवर चढून जाणारे काही लोक या जगात आहेत. मात्र, एखाद्या उत्तुंग इमारतीवरून एखादा सामान्य माणूस कुशलतेने खाली उतरून येणं ही बाब आश्चर्याचीच आहे. चीनमध्ये अशाच एका माणसाचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. हा माणूस तब्बल 30 मजली इमारतीवरून खाली उतरला! विशेष म्हणजे यावेळी त्याने कोणतीही सुरक्षेची साधने वापरलेली नव्हती. त्याने असे कृत्य का केले हे समजू शकलेले नाही.

चीनच्या गुइयांग येथील हुआगुयुआनचा हा व्हिडीओ आहे. तिथे 27 मे रोजी दुपारी पांढरा शर्ट परिधान केलेला एक माणूस उंच इमारतीवर दिसून आला. तो जरा विचित्र वागतोय असे दिसत होते. त्याने आधी डोके खाली केले आणि हवेत पाय लटकवले. तो माणूस वारंवार त्याच्या फोनकडे पाहत होता आणि मग अचानक खाली वाकून जणू काहीतरी घेण्याचा तो प्रयत्न करीत होता. मात्र, यावेळी बचाव पथक तिथे पोहोचले होते. त्यानंतर अचानक त्याने खिडकीवर पाय ठेवला आणि टप्प्याटप्प्याने सावकाश खाली उतरण्यास सुरुवात केली. प्रत्येक मजल्यावरील खिडक्या व गॅलरीच्या मदतीने तो खाली उतरू लागला.

खरे तर इतक्या उंचीवरून खाली पाहताच एखाद्याच्या पोटात गोळा येऊ शकतो आणि डोळे गरगरू शकतात. मात्र, हा माणूस अतिशय शांतपणे एक एक मजला खाली उतरून येत होता. ही 30 मजली इमारत शंभर मीटरपेक्षाही अधिक उंच आहे. तो खाली उतरत तिसर्‍या मजल्यावरील खिडकीजवळ पोहोचताच त्याला आत ओढले गेले. ज्यांनी त्याला आत ओढले ते रेस्क्यू टीममधील असावेत असा अंदाज आहे.

Back to top button