अहमदनगर

नगरमधील शिवसैनिकांची पंचाईत!

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेत बंडखोरी करीत एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत घरोबा करीत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गेल्या आठ दिवसांपासून बंडखोरांविरुद्ध शिवसेनेत धगधगते वातावरण असताना नगर सेनेने ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचा निर्धार केला होता, पण, आज नगर सेनेला कायमच पाठबळ देणारे, एक शिवसैनिक मुख्यमंत्री झाल्याने नगरमधील शिवसैनिकांची पंचाईत झाली. ठाकरेंच्या पाठीशी रहावे की शिंदेसोबत जावे, असा संभ्राम निर्माण झाला आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेचे मतदान झाल्यानंतर थेट गुजरात गाठले. त्यानंतर हळूहळू शिवसेनेतील अनेक आमदार आणि मंत्री शिंदे गटात सामील झाले. सुरूवातील शिवसैनिकांना शिवसेनेत नेमके काय चालले आहे हे समजत नव्हते. बंडखोर आमदारांविरुद्ध महाराष्ट्रात शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. नगरमध्ये शिवसैनिकांनी मेळावा घेत सर्वच बंडखोर आमदारांच्या प्रतिमा जाळल्या होत्या.

आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांबरोबर अशी घोषणाबाजी शिवसैनिकांनी त्यावेळी केली. मात्र, आज शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने नगर जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये आता संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. आता नेमके कोणाचे नेतृत्व मान्य करायचे असा प्रश्न शिवसैनिकांसमोर उभा राहिला आहे. तसे, शिवसैनिक व पदाधिकारी खासगीत ही भावना व्यक्त करत आहेत.

आता बोलणे उचित नाही

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. तर, आता शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे आताच यावर प्रतिक्रिया देणे उचित ठरणार नाही. यापुढे नेमके काय होतेय ते पाहू, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या एका जिल्हा पदाधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. आम्ही, 'थांबा आणि पहा' या भूमिकेत आहोत, असल्याचे युवा सैनिकाने सांगितले.

आम्ही दोन दिवसांपूर्वीच भूमिका जाहीर केलेली आहे. त्यामुळे आम्ही काहीही झाले तरी शिवसेनेसोबत राहू. पण सेना कोणती, ठाकरे की शिंदे यावर त्यांनी बोलणे टाळले.

                                                – संजय शेंडगे, माजी विरोधी पक्षनेते

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT